लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेससाठी उपयुक्त : प्लॅटफॉर्म 1-2 मध्ये सुविधा
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसची संख्या वाढल्याने रेल्वेमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 च्या मध्ये ही व्यवस्था करण्यात आल्याने पाणी भरण्याची समस्या दूर होणार आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही कमी वेळेमध्ये पाणी भरणे शक्य होणार आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर यापूर्वी पाणी भरण्याची व्यवस्था नसल्याने एक्स्प्रेस जास्त काळ थांबत नव्हत्या. हुबळी अथवा मिरज येथे पाणी भरण्याची व्यवस्था असल्याने बेळगावमध्ये शेवटचा थांबा असणाऱ्या गाड्यांना हुबळी येथे थांबून पाणी भरावे लागत होते. बऱ्याच वेळा पाण्याची कमतरता असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बेळगावमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. मागील दोन दिवसांपासून प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 च्या मध्ये लोखंडी खांब उभे केले जात आहेत. त्यानंतर पाईप बसविले जाणार असून पाणी भरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-म्हैसूर, बेळगाव-काझीपेट एक्स्प्रेसला बेळगावमध्ये शेवटचा थांबा आहे. त्यामुळे या सर्व एक्स्प्रेसमध्ये पाणी भरणे तसेच स्वच्छता करणे याची व्यवस्था आता बेळगावमध्ये होणार आहे.









