तलाव थोडाबहुत भरून ठेवण्याची गवळी बांधवांची मागणी
बेळगाव : गोवावेस जक्केरी होंडा येथे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर तलावातील पाणी काढण्यात आले. तलावात पाणी नसल्यामुळे गुराख्यांचे हाल होत आहेत. त्यांची जनावरे यापूर्वी तलावातील पाणी पित होती. परंतु, सध्या तलावात पाणी नसल्याने जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार शहापूर परिसरातील गवळी बांधवांनी केली आहे. जक्केरी होंडा येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलाव बांधण्यात आला. या तलावामध्ये बारमाही पाणी असते. विसर्जनानंतर गणेशमूर्ती काढल्या जातात. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये पाणी भरले जाते. यामुळे जनावरांना वर्षभर पाणी पिण्यास मिळते. शहापूर, आनंदवाडी, गोवावेस येथील गवळी बांधवांची जनावरे या ठिकाणी पाणी पिण्यास जातात. तसेच या तलावाला नैसर्गिक झरे असल्याने कायम पाणी भरत असते.
निर्माल्य-कचऱ्यामुळे तलाव गलिच्छ
मध्यंतरी पाण्याचा वास येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर तलावातील पाणी काढण्यात आले. यापूर्वी हे पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरले जात असल्याने गवळी बांधवांकडून तलावाची स्वच्छता होत होती. परंतु, सध्या मात्र निर्माल्य तसेच कचऱ्यामुळे हा तलाव पूर्णत: गलिच्छ झाला आहे. तसेच पाण्यासाठी जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेने हा तलाव पाण्याने पुन्हा भरावा व जनावरांची सोय करावी, अशी मागणी गवळी बांधवांनी केली आहे.
जनावरांसाठी तलावात पाणी सोडा
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी जक्केरी होंडा तलाव महत्त्वाचा आहे. परंतु, या ठिकाणचे पाणी स्थानिकांच्या तक्रारीनंतर काढण्यात आले. परंतु, सध्या त्या तलावामध्ये निर्माल्य तसेच इतर कचऱ्यामुळे विद्रुपीकरण झाले आहे. याची दखल घेत प्रशासनाने तलावामध्ये पाणी भरून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
– रोहित भांदुर्गे, आनंदवाडी









