पाण्याचा निचरा होण्याचे योग्य नियोजन नसल्याकारणाने नागरिकांना नाहक त्रास
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून पावसाने शहरासह परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पाण्याचा निचरा होण्यास योग्य नियोजन नसल्याकारणाने घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहरातील खासबाग येथील राघवेंद्र कॉलनीतील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. दमदार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी शिरले आहे तर अनेक घरांची पडझड झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. तसेच अनेक नागरिकांकडून नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळेही पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
नैसर्गिकरित्या असणारे पाण्याचे प्रवाहित होण्याचे मार्ग अडविण्यात आल्यामुळे नागरी वसतीमध्ये पाणी शिरत आहे. याला प्रशासकीय व्यवस्था व नगर नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. नैसर्गिकरित्या प्रवाहित होण्याच्या पाण्याच्या मार्गांवर भराव टाकून घरे बांधण्यात आली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सखल भागासह अनेक उपनगरांमध्ये घरे बांधलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. पंपसेटच्या साहाय्याने पाणी उपसा करावा लागत आहे. राघवेंद्र कॉलनी येथील नागरिकांच्या घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. परिणामी घरांमध्ये वास्तव्य करणे कठीण झाले आहे. पाणी उपसा करण्यासाठी रहिवाशांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मनपा अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना मदत करण्याची मागणी होत आहे.









