वार्ताहर /माशेल
तामसुली-बेतकी येथील योगेश गावडे यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरातील सामान व इतर वस्तूंची नासधूस झाली. मंगळवारी सायंकाळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्यावेळी ही घटना घडली. त्यात घरमालकाचे साधारण ऊ. 2 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. योगेश गावडे राहत असलेल्या घराजवळच नवीन भूखंड पाडण्यात आले आहेत. या भूखंडातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली नसल्याने मोठ्याप्रमाणात साचलेले पाणी थेट योगेश गावडे यांच्या घरात घुसले आहे. त्यांच्या घराला पाण्याचा वेढाच पडला आहे. अचानकपणे पाण्याचा मोठा प्रवाह घरात घूसल्याने लहान मुलांसह घरातील इतर मंडळींची एकच धावपळ उडाली. घरातील किचन, बॅडरुमसह सर्व खोल्यामध्ये पाणी शिरल्याने रात्री झोपण्यासाठीही त्यांना सुरक्षित जागा राहिलेली नाही. स्थानिक सरपंच विशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.









