गुहागर :
तालुक्यात गेले २ दिवस झालेल्या पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत व असगोली गावांना बसला. पालशेत सावरपाटी येतील ८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पाचमाड परिसरातील घरांमध्येही पाणी शिरले. साखरीआगर धरणवाडी येथे अभिजित माईन यांच्या घरावर दरड पडली.
दोन दिवसात पालशेत, वरवेली, असगोली, गुहागर या भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने नदीनाले वेगाने प्रवाहित झाले. असगोली खारवीवाडीतील नाल्यात इतक्या वेगाने पाणी आले की, नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूंची जमीन खचली, पुलावरील सर्व डांबर उखडून गेले. पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली. पुलावरून ३ फूट पाणी वाहत लोकवस्तीतही शिरले. नाल्याशेजारील पालशेतकरांच्या घराला पाण्याने वेढले होते. असगोलीत जाणाऱ्या रस्ताही प्रथमच पाण्याखाली गेला होता. असगोलीत नथुराम पावसकर यांचा संरक्षक बांध कोसळला. हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले.
पालशेत, वरवेलीमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. या पर्जन्यवृष्टीमुळे वरवेली शाळेजवळ दरड कोसळली. पाटपन्हाळेतील एका घराचा बांध कोसळला. पालशेत आगडी मंदिराजवळ राकेश जाक्कर यांच्या घराजवळचा बांध कोसळला. पालशेत सावरपाटी व पालशेत पाचमाड परिसरात घरामंध्ये पाणी शिरले. सायंकाळी ६ च्या सुमारास पाऊस थांबल्यावर पुराचे पाणी अवघ्या अर्ध्या तासात ओसरले. तसेच आगडी मंदिर येथे योगेश जाक्कर यांच्या घरात मागच्या बाजूस दरडीचा भाग कोसळल्याने माती घरात आली.पाचमाड भागातही काही घरात पाणी शिरले. अडूरमधील सुधीर धोंडू दहिवलकर यांच्या घराशेजारील बांध कोसळला. असगोलीकडे जाणाऱ्या सखल भागातील रस्ता पाण्याखाली गेला तर असगोली खारवीवाडीतील नाल्याला पूर आला. या पाण्याने पुलावरील डांबर पूर्णपणे उखडून टाकले. टाकले. यामुळे पुलावरील वाहतूक बंद आहे. तसेच साखरीआगर जि. प. शाळेजवळील दरड कोसळून मोठी हानी झाली. अडूर येथील चिखलगाव व नागझरीतील ओढ्याला असणारी संरक्षक भिंत कोसळून पाणी भातशेतीत घुसले असून शेतीचे नुकसान झाले. मोडकाघर-पालशेत रस्त्यावर ठिकठिकाणी माती आली. पालशेतमध्ये सुमारे १६ घरांमध्ये व काही दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. यावेळी तहसीलदारांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. एअरटेल व वीज कंपनीच्या वाहिन्यांमुळे रोहिले पूल ते तवसाळ रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
- नरवण गाव सावरतेय…
१२ जून रोजी झालेल्या पावसाने नरवणमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली वेगाने काम सुरू आहे. रस्त्यावरील दगड, माती हटविण्यात आली आहे. आता उतारावर भूमिगत वाहिन्यांसाठी खणलेले चर बुजवण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. १३ जूनला ठेकेदाराचा प्रतिनिधी अधिकाऱ्यांसमवेत २ तास नरवण गावात उपस्थित होता. त्यावेळी हे सर्व काम करून देऊ, असे सरपंच व अन्य ग्रामस्थांना सांगितले. तेव्हापासून तो प्रतिनिधी नरवण गावात फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बांधकामचे अधिकारी, कर्मचारी यांनी १३ जूनला रात्री २ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.








