औरंगाबादला महिन्यातून चार वेळाच पाणी : कोल्हापुरात ना टँकर, ना पाणी कपात
कोल्हापूर/संतोष पाटील
राज्यातील 270 गावं आणि 679 वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद शहराला 45 मिनिटं ते 1 तास अवधीसाठी तर महिन्यातून फक्त चार वेळाच नळाने पाणीपुरवठा होत आहे. कोल्हापूर मार्च 2022 ते एप्रिल 2023 या काळात शहरात फक्त नऊ वेळा कपात झाली. तीही पाणी नाही, म्हणून नव्हे तर दुरुस्तीसह तांत्रिक कारणास्तव ही कपात करण्यात आली. उर्वरित महाराष्ट्र पाण्यासाठी टाहो फोडत असताना, कोल्हापूर शहर-जिल्हा पाण्याच्या बाबत खूपच समृद्ध म्हणावा लागेल. याउलट कोल्हापूरकरांना पाण्याचा अतिरेक, अवाजवी, अकारणीय वापराबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, जालना, हिंगोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिह्यातील 270 गावे आणि 679 वाड्यांना सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मराठवाड्यासाठी 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा शासनाकडे सादर केला आहे. अवकाळी पावसामुळे यंदा उन्हाळ्यात विदर्भ मराठवाड्यात पिण्याचे पाणी मुबलक आहे. तरीही भविष्यात पाणी टंचाईग्रस्त पाच हजार 386 गावं आणि वाड्यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत राज्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या अजून वाढणार आहे. कोल्हापूर जिह्यातील 4 मोठी धरणे, 8 मध्यम तर 53 लघु प्रकल्प, 453 गाव तलाव, 103 पाझर तलाव, 61 हजार बोअरवेल, 327 झरे, 4167 हातपंप, 1847 शेत व विहिरी,987 सार्वजानिक विहिरी, 939 बोअरवेल योजना आदीद्वारे तब्बल सव्वाशे टीएमसी इतका प्रचंड पाणीसाठा करण्याची क्षमता जिह्याची आहे. एकीकडे सांगलीपासून मराठवाडा, विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू असताना कोल्हापूर जिल्हा मात्र यामध्ये भाग्यशाली ठरला आहे.
औरंगाबादकरांना वर्षातील सुमारे 310 दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागते. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूर पाण्याबाबत कमालीचे श्रीमंत असल्याचे वास्तव आहे. मुबलक पाणी असल्याने दुर्भिक्ष्य कधी जाणवलेच नाही. शहर आणि लगतच्या आठ लाख लोकसंख्येसाठी शिंगणापूर, बालिंगा येथून पंचगंगेतून आणि कळंबा तलावातून पाणी उपसा केला जातो. शिंगणापुरातील पाणी पुईखडी आणि कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. बालिंगा आणि येथील पाणी चंबुखडी फिल्टर हाऊसमध्ये शुध्द करुन वापरले जाते. कळंबा तलावातील पाणी कळंबा फिल्टर हाऊसमध्ये शुध्द केले जाते. पाणी साठा कमी झाल्यास मे महिन्याच्या अंतीम टप्प्यात या तलावातून उपसा होणारे आठ दशलक्ष लिटर पाणी बंद करुन पर्यायी व्यवस्था केली जाते.
जिह्यातील 157 गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई आहे. यामध्ये डोंगराळ भागातील छोट्या-वाड्यावस्त्यांची संख्या अधिक आहे. 2012 मध्ये जिह्यातील शिरोळ तालुक्यात तमदलगे या एकाच गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता; मात्र तेथेही आता पाणी योजना कार्यान्वित आहे. गेल्या 10 वर्षात ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोल्हापूर महापालिका वगळता अनेक भागात नळ पाणी पुरवठा योजनेतील नळांना तोट्या नाहीत. नैसर्गिक स्त्राsत व पाणी साठ्यातून अमर्याद पाणी उपसा केला जातो. बेसुमार पाणी उपसा पुन्हा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. नैसर्गिक जलस्त्राsतांचे बळकटी करुन पाणी साठे, नदी व तलाव प्रदुषण मुक्त ठेवणे ही काळाची गरज आहे. राज्यातील पाणीटंचाई पाहता कोल्हापुरातील अवास्तव वापरावर जनजागृतीतून निर्बंध घालण्याची अधिक गरज आहे.
डॉ. चौधरी यांचा पाया.., डॉ. बलकवडेंचा कळस
शिंगणापूर गळक्या पाईपलाईन योजनेमुळे 2018 पर्यंत शहरात रोज लहान- मोठ्या 20 ठिकाणी गळती होत्या. यातून किमान 50 ते 70 दशलक्ष लिटर म्हणजेच सरासरी चार लाखांचे पाणी रोज वाया जात होते. शहरातील अंतर्गत पाईपलाईनसह पाण्याचा एकूण वापर व त्याचे बिलींग याचा ताळमेळ घालण्यासाठी चार कोटी रुपये खर्चून केलेले वॉटर ऑडीट फसवे ठरले. मोठ्या गळतीचे काम हाती घेऊन निविदा प्रक्रिया कासवगतीने होत असल्याने संबंधितांचा पगार बंदचा आदेश तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना काढला होता.
डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वत: सुत्रे हाती घेत, या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगातील ‘पाणी’ काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाणीपुरवठ्याला शिस्त लागली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नियमित आणि कालबध्द पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केले. डॉ. बलकवडे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत शहरात पाणी नियोजन होऊन संपूर्ण शहरात योग्य आणि नियमित पाणीपुरवठा सुरू झाला. शहरतील पाणीपुरवठ्याची घडी बसवण्यासाठी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाया रचला. गेल्या अडीच वर्षात डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाणी नियोजन यशस्वीतेचा कळस बांधून शहरातील पाणी-बाणी संपवली.
कासवछाप योजना
शहरात अमृत योजनेतून 115 कोटी रुपये खर्चून 350 किलोमीटरची अंतर्गत पाईपलाईन बदलण्यात येत आहे. 13 टिकाणी नवीन पाणी टाकीचे बांधकाम सुरू आहे. योजनेच्या यशस्वीतेसाठी शहरातील ऑटर ऑडीट हा महत्वाचा टप्पा होता. बारा वर्षात काळम्मावाडी पाईपलाईन योजना कासवछाप ठरली. तत्पूर्वी शिंगणापूर ही गळकी योजना शहरवासियांच्या नशिबी आली. अमृत योजनेतून शहरवासियांना शुध्द व मुबलक पाणी मिळण्याची गेल्या 4 वर्षापासून आशा आहे. 550 किलोमीटर पाईपलाईनचा नेमका आराखडाच नसणे व किमान 300 व्हॉल्व्ह रस्त्याखाली गायब झाल्यानेच नियोजन कोलमडते.कपातीचे कारण पाईपलाईन बदलणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, वीजपुरवठा खंडित, उपसा पंप किंवा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड आदी तांत्रिक कारणास्तव फक्त नऊ वेळा पाणी कपातीचा निर्णय झाला. पाणी नाही म्हणून कपात झाली नाही. एप्रिल मे महिन्यात तीन वेळा दुरुस्तीसाठी कपात केली. या गळतीतून रोजचे 50 हजार रुपयांचे वाया जाणारे पाणी वाचले.
नेत्रदीप सरनोबत (जलअभियंता)









