पाण्याची पातळी एक मीटरने अद्यापही खाली
आजही शहरात पाणीबाणी, उद्यापासून सुरळीत पुरवठा
कोल्हापूर प्रतिनिधी
पंचगंगा व भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेच्या रॉ वॉटर पंपिंग स्टेशनला कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. यामुळे पाणी उपसावर परिणाम झाल्याने शहरावर पाणी संकट आले आहे. अद्यापही एक मीटरने पाण्याची लेव्हल कमी आहे. यामुळे सोमवारीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारी असे दोन दिवसांत 75 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
धरण क्षेत्रातून पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नसल्याने पंचगंगा व भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. यामुळे महापालिकेच्या शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने उपसा पूर्ण क्षमतेने होत नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असून नदीत पाणी सोडले आहे. रविवारी दिवसभरात शिंगणापूर व बालिंगा येथील नदीची पाणी पातळी 535.40 मीटर इतकी झाली असून,
अजून आवश्यक पाणी पातळी 536.00 मीटर इतकी आहे. एक मीटर पाण्याची पातळी खालीच आहे. सोमवारी सकाळपर्यंत पाण्याची लेव्हल होईल, असा मनपाचा अंदाज आहे. यामुळे सोमवारीही शहरात अपुरा व कमी दाबानेच पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे. असे आवाहन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केले आहे.
शहरात 38 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
ऐन सणावेळी पाणी संकट आल्याने महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. बावडा फिल्टर व कळंबा फिल्टर येथून कुंभार गल्ली, सुभाष रोड, उद्यम नगर, पंचगंगा रोड, उत्तरेश्वर परिसर, शिवाजी पेठ, टेंबे रोड, दिलबहर तालीम, बागवान गल्ली अकबर मोहोला, बाजार गेट, राज कपूर पुतळा, मंगळवार पेठ, देवकर पाणंद या परिसरात दोन दिवसांत कोल्हापूर महापलिका टँकरच्या 65 वर्दी व खासगी टँकरचे 10 वर्दी झाल्या. यापैकी रविवारी 38 ठिकाणी पाणीपुरवठा टँकरने झाला.
पाण्याची समस्या संपणार केव्हा
वर्षभरापासून शहरात पाण्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. ढिसाळ नियोजन, कालबाह्या यंत्रणा आणि गळकी पाईपलाईन यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कधी उपसा केंद्रातील पंपात बिघाड तर कधी पाईपलाईन गळती यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची समस्या केव्हा संपणार असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
थेटपाईपलाईने तरी पाणीपुरवठा होणार का?
काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले. या योजनेतून काळम्मावाडी धरणातून थेट शहरात पाणी आणले जाणार आहे. या ठिकाणी नवीन उपसा केंद्र असल्याने ते बिघाड होण्याचा प्रश्न नाही. मात्र, थेटपाईपलाईनचे पाणी पुईखडी येथे येणार आहे. तेथून शहरात वितरीत होणार आहे. शहरातील बहुतांशी अंतर्गत पाईपलाईन जुन्या आहेत. त्यामुळे थेटपाईपलाईनने तरी पाण्याचा प्रश्न मिटणार काय असा सवालही उपस्थित होत आहे.









