दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी संपविले उपोषण : प्रकृती बिघडल्याचे दिले कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या जलमंत्री आतिशी यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण 5 व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मागे घेतले आहे. आतिशी यांची सोमवारी रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याचे सांगत आप नेत्यांनी मंगळवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करविले आहे. आप खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत आतिशी यांचे उपोषण आता संपल्याची घोषणा केली. आतिशी यांची ब्लड शुगर लेव्हल (रक्तशर्करा पातळी) 36 वर पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आतिशी यांनी दिल्ली जलसंकटावरून 21 जूनपासून उपोषण सुरू केले होते. हरियाणाकडून दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडले जात नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु हरियाणा सरकारकडून कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.
उपराज्यपालांकडून हरियाणा मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही आता दिल्लीच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यासाठी पत्र लिहिणार आहोत. उपराज्यपालांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. यामुळे आम्ही आता हे बेमुदत उपोषण स्थगित करत आहोत. आम्ही सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत संसदेत यासंबंधी आवाज उठविणार आहोत असे आप नेत्याने म्हटले आहे.
भाजपवर केला आरोप
दिल्लीची लोकसंख्या तीनपट वाढूनही 1994 मध्ये झालेल्या कराराच्या अंतर्गत पाणी सोडले जात होते, परंतु आता त्यातही कपात केली जातेय. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने 12 हजार किलोमीटर लांबीची नवी पाइपलाइन निर्माण केली आहे. तर कालव्याच्या दुरुस्तीसाठी 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीच्या लोकांना पाणी देण्यासाठी आप सरकारने सर्व प्रयत्न केले आहेत. तर दिल्लीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत सात खासदार भाजपचे निवडून आणले आणि भाजप सरकारने दिल्लीवासीयांचे पाणीच रोखल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. दिल्लीवासीयांना पाणी मिळवून देण्यासाठी आतिशी यांनी प्रयत्न केले, परंतु कुठलाच तोडगा न निघाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांची ब्लड शुगर लेव्हल 36 पर्यंत खालावली, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचा दावा संजय सिंह यांनी केला.
मी 13 दिवसांपर्यंत….
हरियाणा जोपर्यंत पाणी सोडत नाही तोवर उपोषण करण्याचा संकल्प जाहीर केलेल्या आतिशी यांनी पाचव्या दिवशीच माघार घेतली आहे. यानंतर एकीकडे भाजपने आम आदमी पक्षावर उपरोधिक टीका केली. तर आप खासदार स्वाति मालिवाल यांनीही आतिशी यांना लक्ष्य केले. मी तर 13 दिवसांपर्यंत उपोषण केले होते. सत्याग्रह नेहमी पवित्र मनाने केला जातो. खोट्या आणि गलिच्छ कृत्यं करणाऱ्यांना उपोषणाची शक्ती मिळत नाही. मी दोनवेळा उपोषण केले, एकदा 10 दिवस तर दुसऱ्यावेळी 13 दिवसांपर्यंत उपोषण केले हेते. माझ्या उपोषणानंतर बाल लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांसाठी मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली. संघर्षाचा मार्ग अत्यंत अवघड असतो. अनेक वर्षे तळागाळात संघर्ष करूनच उपोषण करण्याची शक्ती प्राप्त होते. इतरांविषयी दिवसभर खोटा प्रचार करून ही शक्ती मिळत नाही असे म्हणत मालिवाल यांनी आतिशी यांना लक्ष्य केले आहे.
‘आप’च्या खोट्या सत्याग्रहाचा पर्दाफाश
दिल्लीत आप’ सरकारच्या भ्रष्टाचारामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. हे सत्य लपविण्यासाठीच आम आदमी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या खोट्या सत्याग्रहाचा पर्दाफाश झाला असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केली आहे.









