सीमाहद्दीतील डोंगर क्षेत्रात व्यवस्था : महाराष्ट्र वनखाते सक्रिय, कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती
बेळगाव : वाढत्या उष्म्याने मनुष्याबरोबर पशु-पक्ष्यांचेही हाल होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत वनखात्यामार्फत डोंगर क्षेत्रात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. सीमाहद्दीतील सुंडी, महिपाळगड, देवरवाडी, बसुर्ते, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड डोंगर पायथ्याशी पाणवठे निर्माण केले आहेत. उन्हामुळे डेंगर परिसरातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे पाण्याविना हाल होऊ लागले आहेत. दरम्यान, निसर्गप्रेमी व प्राणीप्रेमींनी डोंगर परिसरात पाणवठे निर्माण करावेत, अशी मागणी केली होती. याची दखल घेत पाण्याविना असह्या झालेल्या वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. आशा परिस्थितीत वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. याची दखल घेत पाटणे येथील वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे आणि सहकाऱ्यांनी सीमाहद्दीतील सुंडी, महिपाळगड परिसरात पाणवठे निर्माण केले आहेत.
सीमाहद्दीतील डोंगर परिसरात गवी रेडे, ससे, साळींदर, तरस, जंगली डुक्कर, मोर आणि इतर पक्ष्यांची संख्या मोठी आहे. या वन्यप्राणी आणि पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी व्यवस्था केली आहे. वाढत्या उन्हामुळे डोंगर परिसरात वन्यप्राण्यांना चारा, पाणी मिळेनासा होऊ लागला आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर होऊ लागले आहेत. तर काही वेळा डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात धुमाकूळ घालू लागले आहेत. मागील आठवड्यात बेकिनकेरे येथील डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात 30 ते 35 गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला. त्यामुळे बटाटा, रताळी, ऊस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. डोंगर परिसरात चारा उपलब्ध नसल्याने वन्यप्राणी सैरभैर होऊन काहीवेळा मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. यातूनच मानव आणि वन्य प्राणी संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. वन्य प्राण्यांचे तहान भागविण्यासाठी पाटणे वनक्षेत्र विभागातर्फे सीमाहद्दीत कृत्रिम पाणवठे तयार केले आहे. त्यामुळे डोंगर क्षेत्रात वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.
सीमाहद्दीतील डोंगरक्षेत्रात 4 ठिकाणी पाणवठे
सध्या उन्हामुळे चारा पाण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करत आहेत. जंगलात पाणी उपलब्ध होत नसल्याने चार ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. चार दिवसांतून एकदा यामध्ये पाणी सोडले जात आहेत. सीमाहद्दीतील डोंगर क्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 30 गव्यांचा एक कळप स्थिर झाला आहे. वन्यप्राणी आणि पक्ष्यांची पाणवठे तयार करून तहान भागविली जात आहे.
-प्रशांत आवळे, वनक्षेत्रपाल, पाटणे









