कॅन्टोन्मेंटच्या मासिक बैठकीत शिक्कामोर्तब : होर्डिंग्जना मुदत
बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना यापुढे पाणीपट्टीसाठी वार्षिक 1800 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 1500 रुपये असणारी पाणीपट्टी आता 300 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. महानगरपालिकेप्रमाणेच 2500 रुपये पाणीपट्टी करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार 1800 रुपये पाणीपट्टी निश्चित करण्यात आली. मालमत्ता कर वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव होता. परंतु, तूर्तास मालमत्ता कर आहे तोच ठेवण्याबाबत कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विविध मुद्द्यांकरिता शुक्रवारी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला खासदार जगदीश शेट्टर, आमदार असिफ सेठ,
कॅन्टोन्मेंट सीईओ राजीवकुमार व सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. प्रारंभी किरण निपाणीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्री, तसेच त्यांच्या क्वॉर्टर्ससाठी गॅसपाईपलाईन घातली जाणार आहे. यासाठी कॅन्टोन्मेंटमधील अनेक मार्गांवर खोदाई करण्यात येणार असून खोदाई करण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या. त्याबरोबरच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून उद्यानांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये पारंपरिक शिवजयंती साजरी केली जाते, त्यापूर्वी हायस्ट्रीट मार्गावर ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असा नामफलक लावावा, अशी सूचना सुधीर तुपेकर यांनी केली. त्याला बोर्ड मिटींगमध्ये सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
निष्क्रिय शिक्षकांना नोटिसा
कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जे शिक्षक व मुख्याध्यापक निष्क्रिय आहेत, त्यांना लवकरच नोटिसा दिल्या जाणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डने सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे अहवाल तयार केले असून त्यामध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्यात आली असून ती यादी कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत सादर करण्यात आली. अशा शिक्षकांना सुरुवातीला नोटिसा दिल्या जाणार असून तरीदेखील कामात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हिंडलगा रोडवरील विक्रेत्यांना हटवा…
गांधी स्मारकापासून हिंडलगा गणपती मंदिरापर्यंत अनेक फळविक्रेते व गृहोपयोगी साहित्याची विक्री सुरू आहे. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने येथील विक्रेत्यांना त्वरित हटवा, अशा सूचना ब्रिगेडियर मुखर्जी यांनी अभियंत्यांना दिल्या. कॅन्टोन्मेंट हद्दीत लावण्यात आलेले होर्डिंग्जचे भाडे भरले नसल्याने बागलकोटी अॅडव्हर्टाईजमेंटवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तूर्तास त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर कारवाई करून काळ्या यादीत समावेश करण्याचा इशारा देण्यात आला.









