नगरसेवक शंकर पाटील यांची महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कॉलेज रोडवरील गटारीतून पाणी वाहून जाणे बंद झाले होते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याचे लक्षात येताच गटार फोडून अडकलेला केरकचरा काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर सदर गटार बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भक्तांची गर्दी होत असल्याने संभाव्य धोका ओळखून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व उपनगरातील नाले व गटारींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
त्यानुसार गटारी व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. पण ज्या ठिकाणी गटारीवर झाकण नव्हते त्याठिकाणी मात्र केरकचरा अडकल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले होते. परिणामी पाणी वाहून जाण्याऐवजी गटारीबाहेर रस्त्यावरुन वाहत जात होते. कॉलेज रोडवर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे गटारीवरील काँक्रीट व पेव्हर्स फोडून तेथील केरकचरा काढण्यात आला होता. पण अद्यापही सदर गटारीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तेथील लोखंडी सळ्या धोकादायक स्थितीत आहेत. गणेशोत्सवानिमित्त दिवसेंदिवस शहरात गणेश भक्तांची गर्दी होत आहे. सदर गटारीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक शंकर पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.









