जैतनमाळ परिसरातील संतापजनक प्रकार : पोलिसांत तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
जैतनमाळ-उद्यमबाग येथे शेतजमिनीमध्ये फौंड्रीमधील टाकाऊ वाळू व इतर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतजमिनीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतजमिनीत फौंड्रीमधील वाळू टाकणाऱ्यांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पिरनवाडी गावच्या हद्दीत येणाऱ्या जैतनमाळ परिसरात कोणाचीही परवानगी न घेता शेतजमिनीत रात्रीच्या अंधारात फौंड्रीमधील टाकाऊ वाळू आणि कचरा टाकला जात आहे. काही ट्रॅक्टरचालक व कामगार या ठिकाणी वाळू टाकत असून याचा परिणाम जमिनीच्या पोतावर होत आहे. तसेच बाजूलाच ज्ञान प्रबोधन मंदिर शाळा असून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या वाळूचा त्रास होत आहे.
मागील वर्षभरापासून हे प्रकार सुरू आहेत. पिकाऊ जमिनीमध्ये औद्योगिक कारखान्यांमधून टाकाऊ कचरा टाकला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काहीवेळा टाकण्यात आलेल्या वाळूमध्ये जळते निखारे असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी मालमत्तेत कोणाचीही परवानगी न घेता असे प्रकार घडत असल्याने संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कारखान्यातील कचरा टाकणाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून उद्धट उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहेत. जाब विचारला की तीन ते चार दिवस वाळू टाकण्याचे प्रकार बंद होतात. परंतु, पुन्हा काही दिवसांनी रात्रीच्या वेळी या ठिकाणी वाळू व कचरा आणून टाकला जात आहे. यामुळे शेतजमिनीत कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. काहीवेळा तर वैद्यकीय कचराही या ठिकाणी टाकण्यात येतो. खासगी व खुल्या जागेत अशाप्रकारे कचरा टाकणे कितपत योग्य आहे, याचा विचार करून पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हानीकारक पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज
कारखान्यातील टाकाऊ वाळू व कचरा टाकण्यासाठी कारखानदारांनी स्वतंत्र जागा खरेदी करून अशा हानीकारक पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे. अंधारात टाकाऊ कचरा खासगी जागेत टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असून या प्रकारामुळे होणाऱ्या नुकसानाला संबंधितांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे. यासंबंधी पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.









