मंत्रीमहोदय तुपाशी, जनता उपाशी, समस्या जैसे थे
प्रतिनिधी / बेळगाव
उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन भरविले जात आहे, असे सांगण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे अधिवेशन होत आहे. मात्र उत्तर कर्नाटकच्या समस्या सुटणे अवघड झाले आहे. केवळ एक सहल म्हणूनच या अधिवेशनाकडे पाहिले जात आहे, असा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
यावषी 19 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन भरविले जाणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना त्यांनी सर्व मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उत्तमप्रकारे बडदास्त करावी, अशी सूचना केली आहे. बेळगावमधील जवळपास सर्वच मोठी हॉटेल्स बुक केली आहेत. त्याकाळात इतरांना खोल्या देऊ नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. हॉटेलमधील रूमपैकी 80 टक्के रूम राखीव ठेवाव्यात, असे स्पष्ट केले आहे. परजिल्ह्यांतून व राज्यातून आलेल्या जनतेला रस्त्यावरच रात्र काढावी लागणार आहे.
इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बेळगावात दाखल होतात. त्यांना आंदोलनस्थळी उघड्यावरच झोपावे लागते. मात्र मंत्रीमहोदयांची बडदास्त केली जाते. जनतेच्या पैशांतूनच ही बडदास्त सुरू असते. त्यामुळे आमच्या पैशांवर तुम्ही मौजमजा करणार व आम्ही मात्र थंडीमध्ये मागण्यांसाठी उघड्यावरच झोपायचे? हा कोणता न्याय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिवेशनासाठी करोडो ऊपये खर्च करण्यात येत आहेत. दरवषीच हा खर्च केला जातो. 400 कोटींहून अधिक ऊपये खर्च करून सुवर्णसौध बांधली. मात्र ती इमारत आता कुचकामी ठरली आहे. एकूणच जनतेच्या पैशांची उधळपट्टीच केली जात आहे.









