त्वरित उचल करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा मोठ्या प्रमाणात कुजला आहे. त्याचे ढिगच्या ढीग एपीएमसीत टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सुटली आहे. यामुळे माशांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन याची त्वरित उचल करावी, अशी येथील व्यापारी आणि कर्मचारी वर्गाची आग्रहाची मागणी आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे. मात्र ज्या ठिकाणाहून कांदा आवक होत आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. याचा परिणाम अर्ध्याहून अर्धा कांदा भिजला आहे. शेतकरी बांधवांनी जरी भिजलेला कांदा वाळवून बाजारात विक्रीसाठी आणला तरी मोठ्या प्रमाणात कांदा कुजण्याचे प्रमाण वाढत.s त्यामुळे कुजलेला कांदा फेकून दिला आहे. त्याचे ढीग परिसरामध्ये पसरलेले आहेत.
त्वरित उचल होणे गरजेचे
कुजलेला कांदा दुकानच्या बाहेर मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. रस्त्यावर बाजूलाच ढीगच्या ढीग आहेत. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने या ठिकाणी कांदा कचऱ्याची दलदल निर्माण होणार आहे. शिवाय हा कचरा सर्व पावसाच्या पाण्याने सर्वत्र दुकानासमोर पसरणार आहे. तरी बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मोठ्या पावसाआधी कुजलेल्या कांद्याची आणि बटाट्यांची उचल करावी. या मागणीला व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.









