दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष : वीजखांब बसविताना फुटली जलवाहिनी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या पाणी पुरवठा पाईपलाईनला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हेस्कॉमकडून नवे खांब उभारताना पाईपलाईन फोडली असल्याने पाणी वाया जात आहे. जिल्हाधिकारी परिसरात येणाऱ्या उपनोंदणी, तालुका पंचायत आदी कार्यालयासाठी नव्याने वीजखांब उभारण्यात आले आहेत. त्यावर केबल वायरदेखील घालण्यात आली आहे. सदर खांब उभारताना जिल्हाधिकारी परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धक्का लागून फुटली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सदर पाणी उपनोंदणी कार्यालयाच्या परिसरात साचत असल्याने या ठिकाणी सरकारी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे.
गळती निवारण करा
पेव्हर्स घालून रस्ता करण्यात आला असला तरी पाण्याच्या निचऱ्यासाठी सुरळीत व्यवस्था करण्यात आली नसल्याने पाणी साचत आहे. आधीच पाऊस नसल्याने पाण्याचे संकट भेडसावत आहे. पाण्याची बचत करणे आवश्यक असताना सरकारी कार्यालयाच्या आवारात झालेली पाण्याचा अपव्यय नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून गळती निवारण करावी. पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









