दोडामार्ग :
तिलारी धरणक्षेत्रापलीकडील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात पाहणीसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गांधील माशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यात तिघेजण जखमी असून त्यातील एका कर्मचाऱ्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांवर दोडामार्ग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाने सांगितले.
याबाबत माहिती अशी की, तिलारी धरण क्षेत्रापलीकडे वनविभागाच्या अखत्यारितील असलेल्या नैसर्गिक राखीव साधनसंपत्ती आहे. त्याच्या देखभालीसाठी वन विभागाचे कर्मचारी जात असतात. त्याचप्रमाणे शनिवारी देखील वनविभागाची 12 कर्मचाऱ्यांचे पथक तिलारी बुडीत क्षेत्राच्या पलीकडे पाटये येथे पाहणीसाठी गेली होती. तिलारी धरणाच्या जलाशयातून बोटीच्या सहाय्याने त्यांनी पलीकडे गेले. त्यानंतर त्यांनी जंगलात प्रवेश केला. जंगलात भ्रमण करताना अचानक गांधील माशांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. गांधील माशांनी हल्ला करताच सर्वजण सैरभैर होऊन वाट मिळेल त्या दिशेने पळाले. मात्र, त्यातील तिघांवर गांधील माशांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात घायाळ झालेल्या त्या तिन्ही कर्मचाऱ्यांना पुनच्छ बोटीने धरणावर आणण्यात आले. त्यांना लागलीच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तिघांवर उपचार करण्यात आले. मात्र, एका कर्मचारी प्रकृती जास्त गंभीर असल्याने त्याला गोवा येथे हलविण्यात आले. तिघांचीही तब्बेत ठीक असल्याचे वन विभागाने सांगितले.








