मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा खडा सवाल : ‘दरवाढ, संविधान बचाव’साठी सीपीएड मैदानावर मेळावा : भाजपवर टीका
बेळगाव : काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना लक्ष्य बनविण्यात आले. या ठिकाणी एकही पोलीस अथवा लष्कराचा जवान उपलब्ध नव्हता. इतका मोठा हल्ला होऊनही याची तसूभरही माहिती गुप्तचर यंत्रणांना नव्हती, हे देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का? याची जबाबदारी केंद्र सरकार स्वीकारणार का? असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारकडून करण्यात आलेली दरवाढ व संविधान बचाव यासाठी सोमवारी बेळगावच्या सीपीएड मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक भारतापर्यंतच्या लढ्यामध्ये भाजप व संघ परिवाराचे योगदान काय आहे? पंतप्रधान मोदी हे सत्तेत आल्यापासून मध्यमवर्गीयांवर कर्जाचा बोजा लादण्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती निम्म्याहून कमी झाल्या असतानाही पेट्रोल व डिझेलचे दर मात्र कमी झालेले नाहीत. ही देशवासियांची फसवणूक नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. खोटे बोलून देशामध्ये जाती-धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. तसेच भाजप व संघाकडून काँग्रेसला डिवचले जात आहे. परंतु, राज्यातील सिद्धरामय्या सरकार अशा पोकळ धमक्यांना घाबरणारे नाही. आज काही भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. परंतु, हे केविलवाणे प्रकार करून राज्यातील काँग्रेस सरकारला काहीच फरक पडणार नाही,असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.
व्यासपीठावर एआयसीसीचे अध्यक्ष व कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, खासदार प्रियांका जारकीहोळी, माजी आमदार अंजलीताई निंबाळकर, आमदार लक्ष्मण सवदी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार असिफ सेठ यांच्यासह कर्नाटकचे मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्य व केंद्रातील भाजप पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. पेट्रोल, डिझेल तसेच स्वयंपाकच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली ती भाजप सरकारमुळेच. जनतेला भाववाढीपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने हमी योजना लागू केल्या. या योजनांमुळे अनेक गोरगरिबांना घरे चालवणे, व्यवसाय करणे सोयीचे ठरले. राज्यातील भाजप दूध दरवाढ केली म्हणून आंदोलन करत होते. परंतु, त्याच दिवशी पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाल्याने भाजपला हे आंदोलन मागे घ्यावे लागले. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनाही याची जाणीव असून त्यांनीही केंद्र सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
80 हजार कोटी रुपये कर्नाटकातील नागरिकांच्या खात्यांवर जमा
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कर्नाटक सरकारने हमी योजनांच्या माध्यमातून 80 हजार कोटी रुपये कर्नाटकातील नागरिकांच्या खात्यांवर जमा केले आहेत. भ्रष्टाचारी भाजप सरकार उखडून काढत काँग्रेसच्या हाती सत्ता देण्यात आली. भाजप हा केवळ वाद निर्माण करणारा पक्ष असून सध्या जनआक्रोश रॅलीचे नाटक त्यांच्याकडून सुरू आहे. याला जनताच उत्तर देईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधत कर्नाटकात सुरू असलेल्या योजनांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने इतर राज्यांमध्येदेखील अशा प्रकारच्या योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रणदीपसिंग सूरजेवाला यांनी वाढत्या महागाई व बेरोजगारी विरोधात नाराजी व्यक्त केली. 2014 मध्ये व आताच्या सिलिंडरच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. काँग्रेस सरकारने सिलिंडरवर सबसिडी दिल्यामुळे दर कमी होता. परंतु, भाजप सरकारने आता ही सबसिडी घटविली असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिलिंडरचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार असिफ सेठ यांनी उपस्थितांचे स्वागत करून राहुल गांधी यांनी देश जोडण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस हा पक्ष संविधानाच्या तत्त्वावर चालतो, असे त्यांनी सांगितले. चिकोडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली.









