पहिल्या कसोटीत भारताचा 1 डाव व 141 धावांनी विजय : यशस्वी जैस्वाल सामनावीर : अश्विनचे सामन्यात 12 बळी
वृत्तसंस्था/ डॉमनिका
यशस्वी जैस्वालची पदार्पणात दीडशतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात 12 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. सामनावीर ठरलेल्या यशस्वी जैस्वालने पदार्पणात 171 धावांची दमदार खेळी केली. उभय संघातील दुसरा कसोटी सामना दि. 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाईल.
शनिवारचा दिवस भारतीय संघासाठी खास ठरला. डॉमनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. यामुळे या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय झाला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलमधील पहिला सामना जिंकत 12 गुण मिळवले. याशिवाय, गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

अश्विनचे पंचक अन् विंडीजचा 150 धावांत खुर्दा
प्रारंभी, वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय संघाने चुकीचा ठरवला. अश्विन-जडेजाच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर संपुष्टात आला. अॅथनेजने सर्वाधिक 47 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. भारताकडून अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रवींद्र जडेजा 3, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यशस्वी झाले होते.
टीम इंडियाचा पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित
यानंतर भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 229 धावांची भागीदारी रचली. यामध्ये रोहित शर्मा 103 धावांवर बाद झाला, तर यशस्वी जैस्वालने 171 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विराट कोहलीनेही 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर रवींद्र जडेजा 37 धावांवर नाबाद राहिला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाले. ईशान किशन 1 धावेवर नाबाद राहिला. दरम्यान, विराट बाद झाल्यानंतर कर्णधार रोहितने आपला पहिला डाव 152.2 षटकांत 5 बाद 421 धावांवर घोषित केला. यामुळे भारताला 271 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
अश्विनच्या फिरकीसमोर विंडीज फलंदाजांची नांगी
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जेव्हा भारतीय डाव घोषित झाला, त्यावेळी दिवसाच्या खेळातील जवळपास 50 षटके बाकी होती. यानंतर अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव उद्ध्वस्त करण्यात जास्त वेळ लावला नाही. 58 धावसंख्येवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर संपूर्ण संघ 130 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावातही यजमानांचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करु शकला नाही. दुसऱ्या डावातही अॅथनेजने सर्वाधिक 28 धावा जमवल्या. जेसन होल्डरने नाबाद 20, जोमेल वॅरिकन 18, अल्झारी जोसेफने 13 आणि जोशुआ डी सिल्वाने 13 धावा केल्या. रॅमन रेफरने 11 धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंदरपॉल प्रत्येकी 7 धावा करून बाद झाले. जर्मेन ब्लॅकवूड 5 आणि रहकीम कॉर्नवेलला केवळ 4 धावा करता आल्या. केमार रोचला खातेही उघडता आले नाही. यामुळे विंडीजचा डाव 50.3 षटकंत 130 धावांवर आटोपला. भारताकडून अश्विनने सर्वाधिक 7, जडेजाने 2 तर सिराजने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज प.डाव सर्वबाद 150.
भारत पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित. विंडीज दुसरा डाव 50.3 षटकांत सर्वबाद 130 (व्रेग ब्रेथवेट 7, चंदरपॉल 7, अॅथनेज 28, वॅरिकन 18, जेसन होल्डर नाबाद 20, जोसेफ 13, डी सिल्वा 13, ब्लॅकवूड 5, कॉर्नवेल 4, आर. अश्विन 71 धावांत 7 बळी, जडेजा 38 धावांत 2 बळी, सिराज 16 धावांत 1 बळी).









