जागृतीअभावी रेल्वेप्रवाशांकडून वापरच नाही : मुख्य प्रवेशद्वारावरूनच प्रवाशांची होतेय अधिक ये-जा
बेळगाव : हुबळी रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर बेळगाव रेल्वेस्थानकात दक्षिण बाजूने नवीन प्रवेशद्वार करण्यात आले. परंतु, या प्रवेशद्वाराबद्दल प्रवाशांना माहितीच नसल्याने प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सर्व प्रवासी मुख्य प्रवेशद्वारानेच रेल्वेस्थानकात येत असल्याने नव्या प्रवेशद्वारासाठी लाखो रुपये खर्च केलेला निधी वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव रेल्वेस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. भविष्यात ही गर्दी टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकाच्या दक्षिण बाजूला नवे प्रवेशद्वार करण्यात आले. गुड्सशेड रोड येथे हे नवीन प्रवेशद्वार करण्यात आले.
यामुळे शहराच्या दक्षिण भागातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे होईल, अशी अपेक्षा होती. दक्षिण भागातील प्रवाशांना रेल्वे उड्डाणपूल ओलांडून मुख्य प्रवेशद्वाराला यावे लागत होते. गर्दीच्यावेळी एकाच वेळी प्रवेशद्वारावर गर्दी होत असल्याने दक्षिण प्रवेशद्वार बांधण्यात आले. दक्षिण प्रवेशद्वारानजीक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तिकीट काऊंटरदेखील उपलब्ध आहे. काही मर्यादित काळासाठी तिकीट काऊंटर सुरू केले जाते. तिकीट काऊंटरपासून लोखंडी जिना देण्यात आला आहे. फूटओव्हरब्रिजला हा लोखंडी जिना जोडण्यात आल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्र. 1 व 2 वर पोहोचणे सोयीचे होते.
प्रवाशांमध्ये जागृती करणे गरजेचे
दक्षिण प्रवेशद्वाराबाबत प्रवाशांना माहिती नसल्याने अद्यापही प्रवासी मुख्य प्रवेशद्वारानेच ये-जा करतात. यामुळे केवळ मोजकेच प्रवासी या प्रवेशद्वाराने प्रवेश करताना दिसतात. पॅसेंजर रेल्वे वगळता इतर प्रवासी प्रवास करत नसल्याने प्रवेशद्वारानजीक शुकशुकाट दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून दक्षिण प्रवेशद्वार बांधण्यात आले खरे, परंतु त्याचा वापरच होत नसल्याने निधी वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दक्षिण प्रवेशद्वाराबाबत प्रवाशांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे.









