अयोध्यानगरात भर दुपारी रिक्षाला आग
बेळगाव : शुक्रवारी भरदुपारी एका ऑटोरिक्षाला आग लागली. एक महिन्यापूर्वी रिक्षाचालकामध्ये झालेल्या भांडणातून दोघा जणांनी रिक्षा पेटविल्याचा संशय असून अयोध्यानगर परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. आगीत ऑटोरिक्षा जळून खाक झाली आहे. हलगा येथील प्रशांत लक्ष्मण बोम्मण्णावर हे आपली रिक्षा घेऊन अयोध्यानगर परिसरात जात होते. त्यावेळी अचानक आग दिसून आल्याने रिक्षा थांबवून ते खाली उतरले. बघता बघता रिक्षाने पेट घेतला. सीएनजीवर चालणारी ही ऑटोरिक्षा असल्यामुळे सिलिंडरचा भडका उडू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी पाणी व माती टाकून आग विझविली. ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीच्या झळांनी याच परिसरात उभी करण्यात आलेल्या चार दुचाकींचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. बंब पोहोचण्याआधीच स्थानिक नागरिकांनी आग विझवली.
मार्केट पोलिसात एफआयआर
यासंबंधी माहिती देताना प्रशांत बोम्मण्णावर यांनी एक महिन्यापूर्वी भाडे नेण्यावरून भांडण झाले होते. तेव्हापासून दोघे जण आपल्या मागावर होते. शुक्रवारी सकाळी आपण बॉक्साईट रोडला भाडे घेऊन गेलो होतो, त्यावेळी आपल्याला धमकावण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत तुझी रिक्षा पेटवून देऊ, अशी धमकी राहुल व त्याच्या मित्राने दिली होती. त्यांनीच पेट्रोल ओतून रिक्षा पेटवली आहे. रात्री उशिरापर्यंत मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









