सांगरुळ, वार्ताहर
खटांगळे फिडर वरील सर्व शेती पंपाच्या बिलाची आकारणी ही मिटर रिडिंग प्रमाणे न होता अश्व शक्ती (एच पी) नुसार होत आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना भरमसाठ बीले येत आहेत. यामुळे आज खाटांगळे फिडरवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोर्चाने येत कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना निवेदन दिले व कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोपर्यंत रीडिंग प्रमाणे बिले येत नाहीत तोपर्यंत बिले न भरण्याचा निर्धार केला व कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न केला तर कर्मचाऱ्यांना ठोकुन काढण्याचा इशारा दिला.
सांगरुळ येथे खाटांगळे फिडरवर असणाऱ्या शेती पंपधारकांनी आज सांगरुळ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी उत्तम कासोटे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात वीज बीले मिटर रिडिंग प्रमाणे येतात पण कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ महावितरण कार्यालया अंतर्गत येणाऱ्या खाटांगळे फिडरवर फक्त अश्वशक्ती (एच पी)प्रमाणे आकारणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वीज वापरापेक्षा चार ते पाच पट जादा दराने आकारणी होत आहे. मागील दोन महापुरात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर खराब झाले होते यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते तरीही पावसाळ्यातील या बंद कालावधीतील बीलाची आकारणी होत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर हा अन्याय होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे नेते शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचे सांगत असतात पण शेतकऱ्यांची भरमसाठ वाढून आलेली बिले याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य वाटत असल्याचे सांगितले.
यावेळी खाटांगळे येथील शेतकरी सर्जेराव पाटील म्हणाले, खाटांगळे गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतीसाठी विहीरींना उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते आठवड्यातून चार ते पाच तास फक्त मोटर सुरू असते इतर वेळी मोटर बंदच असते. मात्र, महावितरण कंपनी अश्वशक्ती प्रमाणे विज बिल आकारून बारा महिन्याचे वीज बिल आकारात असल्याने विज बिलामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मिटर रिडिंगप्रमाणे बिले आकारणी होत नाही तोपर्यंत आपणं विज बिल भरणार नाही. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका विज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांना ठोकुन काढू असा इशारा दिला.यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणने विज बिले तात्काळ दुरुस्त करावे यासाठी कनिष्ठ अभियंता जंगले यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.यावेळी उत्तम कासोटे, एम,बी, खाडे, सुनिल कापडे कृष्णात कासोटे, तानाजी गुरव, विलास मगदूम, पंडीत कासोटे, महादेव खाडे, वसंत चौगुले, रंगराव पाटील, धनाजी पाटील, ज्ञानदेव पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे
अश्वशक्ती प्रमाणे विज बिल आकारू नये याबाबत वारंवार शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविले असता ते आमच्या हातात नसून वरिष्ठ व मंत्रालयाच्या हातात असल्याचे सांगतात. मग तुम्ही फक्त वसुलीची कामे करता का? असा जाब विचारत आम्ही नेमकी दाद मागायची कुणाकडे असा सवाल शेतकऱ्यांनी केला.
वीज कनेक्शन तोडणार नाही
शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे पण हा विषय आमच्या हातात नसून आम्ही याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करू तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जोपर्यंत रिडिंग प्रमाणे बिले येत नाहीत तोपर्यंत बिले भरण्यासाठी तगादा लावणार नाही. तसेच कोणाचेही वीज कनेक्शन कट करणार नाही असेही वरिष्ठांना कळवू असे सांगितले.
Previous Articleसंशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; ATS ची कारवाई
Next Article Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती









