पोलीस खात्यातर्फे पंधरा कर्मचाऱ्यांची 24 तास नजर
बेळगाव : सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत असून 15 कर्मचारी 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. गणेशोत्सव व ईद ए मिलादची मिरवणूक शांततेत पार पडली. यासाठी बेळगावकरांनी व सर्व धर्मियांनी पोलीस दलाला सहकार्य केले. असे असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट पाठवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ही गोष्ट खरी असली तरी समाजमन दूषित करून भावना भडकावणाऱ्या पोस्ट पाठविण्याचा कोणालाच अधिकार नाही. सोशल मीडियाचा वापर प्रत्येकाने जपून करावा. जे प्रक्षोभक पोस्ट पाठवतील, त्यांना लगेच त्याच प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्या पोस्टमुळे समाजात अशांतता निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे अधिकारी व कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. काही जण अभद्र भाषेचा वापर करताना कोणाच्या भावना दुखावणारी किंवा भडकावणारी भाषा असू नये, अशी सूचना देतानाच गुरुवारपासून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.









