पोलीस आयुक्तांचे पत्रकारांसमोर प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या व्हिडिओ वॉरनंतर पोलीस दलाला जाग आली आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सामाजिक शांततेला धक्का पोहोचवणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शनिवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी वरील इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय व जिल्हा पोलीस कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र व्यवस्था कार्यरत आहे. पोलीस स्थानकनिहायही ही व्यवस्था अस्तित्वात आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याअगोदर विचार करा
पालकांनीही आपली मुले काय करतात? याकडे लक्ष द्यावे. पोलीस दलाच्यावतीनेही शाळा-कॉलेजमध्ये जागृती करण्यात येत असली तरी घराघरात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले तरच असे प्रकार रोखता येतात. आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्यासंबंधी खडेबाजार व शहापूर पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याअगोदर किंवा ती शेअर करण्याअगोदर प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.









