तहसीलदार-सार्व. बांधकाम खात्याला निवेदन
खानापूर : तालुक्यातील बैलूर गावचा संपर्क रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. वेळोवेळी विनंत्या, अर्ज करूनदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. येत्या 28 जुलैपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास बेळगाव-चोर्ला रस्त्यावर रास्तारोको करण्याचा इशारा बैलूर ग्रामस्थांनी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपतहसीलदार प्रकाश कट्टीमनी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी लक्ष्मण झांजरे, दामोदर नाकाडी, विठ्ठल राजगोळकर, रामचंद्र नाकाडी, भरमू गुरव, तुकाराम बिरजे, पांडुरंग गुरव यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
बैलूर ते बैलूर क्रॉस हा 5 कि. मी.चा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकवेळा दुचाकी आणि चारचाकींचे अपघात घडले आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याला रस्ता दुरुस्ती करण्याबाबत अर्जविनंत्या करूनदेखील रस्त्याच्या दुरस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बैलूरसह परिसरातील नागरिकांना रस्त्यावरुन जोखीम पत्करुन प्रवास करावा लागत आहे. यासाठी बैलूर ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.येत्या 28 जुलैपर्यंत जर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्यास 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बेळगाव-चोर्ला रस्त्यावर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









