केपेत पावसाने ओलांडले अर्धशतक
प्रतिनिधी /पणजी
राज्यात पावसाने शुक्रवारी थोडी फार उसंत घेतली मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासांत पणजीत 5.5 इंच पावसाची नोंद झाली. जुने गोवेमध्ये 4.5 इंच तर पेडणेमध्ये 4 इंच पाऊस पडला. येत्या दि. 5 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान, केपेमध्ये पावसाने इंचाचे अर्धशतक ओलांडले आहे.
राज्यात मान्सून सक्रिय आहे. गुरुवारी पहाटेपासून शुक्रवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यंदाच्या मौसमातील जुलैमधील मुसळधार पाऊस हा सुरु झाला. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा मंदावला. पावसाचे ढग कोकणामध्ये व मुंबईत बरसले. गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक म्हणजेच 5.5 इंच पावसाची नोंद झाली.
केपेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 50 इंच पाऊस झाला. यंदाच्या मौसमात पावसाच्या बाबतीत केपे बरेच पुढे आहे व अवघ्या महिन्याभरात 50 इंच एवढी विक्रमी नोंद केलेली आहे.
दरम्यान, आगामी 24 तासांत जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. पावसाचा जोर दि. 5 जुलैपर्यंत असाच राहाणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
चोवीस तासांतील पावसाची नोंद
- पणजी 5.5 इंच
- मुरगाव 3.5 इंच
- मडगाव 1 इंच
- पेडणे 2.5 इंच
- फोंडा 2.5 इंच
- जुने गोवे 4.5 इंच
- सांखळी 4 इंच
- वाळपई 2.5 इंच
- काणकोण 3.75 इंच
- दाबोळी 3.5 इंच
- मुरगाव 3 इंच
- केपे 4 इंच
- सांगे अर्धा इंच









