सध्या पुराचा धोका नसला तरी सतर्क रहाण्याचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. मात्र, सध्या पुराचा धोका नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. रविवारी चार तालुक्यांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नदीपात्रावरील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कृष्णा नदीत 1.07 लाख क्युसेक, घटप्रभा नदीत 30 हजार क्युसेक, मलप्रभा नदीत 13 हजारहून अधिक क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. आलमट्टी, हिडकल व नविलतीर्थ जलाशयातील पाण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे भविष्यात पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी अनुकूल होणार आहे. जिल्ह्यातील काही छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिक व शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पाण्याखाली गेलेल्या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत रस्ता पार करण्याचे धाडस करू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या तरी पुराचा धोका नाही.
तरीही नदीपात्रावरील गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. जर पूर आलाच तर त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून निवारा केंद्रांसाठी जागानिश्चिती करण्यात येत आहे. आणीबाणीच्या प्रसंगी नदीकाठावरील नागरिक व जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. बोट व इतर सामग्री तयार ठेवण्यात आली आहे. औषधे, जनावरांसाठी चारा आदींबाबतही साठा उपलब्ध आहे. संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांनी याची तयारी केली आहे. वर्षा पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वेगवेगळ्या धबधब्यांवर गर्दी वाढते आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने जंगल परिसरात असलेल्या धबधब्यांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी वनखाते, प्रवासी मित्र व पोलीस कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनीही धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा, असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
15 पूल पाण्याखाली
संततधारेमुळे जिल्ह्यातील 15 पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी बॅरिकेड्स उभे करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. पाण्याखाली गेलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे सुरक्षिततेसंबंधी जागृती करण्यात येत आहे, असेही पोलीसप्रमुखांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी केली सर्व नद्यांची पाहणी
नदीकाठावरील नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी सुतकट्टीजवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटप्रभा नदीची पाहणी केली. त्यानंतर निपाणी तालुक्यात वेदगंगा व दूधगंगा नद्यांची पाहणी केली. यावेळी निपाणीचे आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनीही संभाव्य पुरासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी भिवशी, कारदगा, जत्राट, बारवाड, कुन्नूर, भोज आदी गावांना भेटी दिल्या. वेदगंगा व दूधगंगामध्ये तब्बल 24 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. चिकोडी तालुक्यातील मांजरीजवळ कृष्णा नदीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर येडूर येथे बोटीतून नदीपात्रात उतरून पाहणी केल्यानंतर पावसाच्या व पाण्याच्या प्रमाणावर सातत्याने नजर ठेवावी. नदीकाठावरील नागरिकांना वेळोवेळी धोक्यासंबंधीची जाणीव करून द्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी माधव गीते यांच्यासह वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









