ऑस्ट्रेलियाला 197 धावांची आघाडी, स्मिथचे अर्धशतक, स्टार्क, ग्रीन, जखमी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या शंभराव्या कसोटीत दमदर द्विशतक झळकावण्याचा दुर्मीळ पराक्रम केला. येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱया कसोटीत मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 3 बाद 386 धावा जमवल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात समाप्त झाला असल्याने ऑस्ट्रेलियाला 197 धावांची आघाडी मिळाली आहे. या कसोटीमध्ये स्टार्क, ग्रीन तसेच दक्षिण आफ्रिकेचा नॉर्त्जे यांना दुखापती झाल्या.

वॉर्नरचा शतकाचा दुष्काळ तब्बल दोन वर्षानंतर समाप्त झाला. मेलबर्नच्या कसोटीत वॉर्नरला पुन्हा फलंदाजीचा सूर मिळाला. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने 1 बाद 45 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. डेव्हिड वॉर्नरचे द्विशतक व स्टीव्ह स्मिथची 85 धावांची खेळी झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती अधिकच मजबूत झाली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. दुसऱया दिवशीचा खेळ संपताना ऍलेक्स कॅरे 9 तर ट्रेविस हेड 48 धावावर खेळत होते.
ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या हातांच्या बोटांना दुखापती झाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ग्रीनची गोलंदाजी प्रभावी ठरली होती. जखमी झाल्याने स्टार्क आणि ग्रीन आफ्रिकेच्या दुसऱया डावात गोलंदाजी करण्याची शक्यता दुरावली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी तिसऱया गडय़ासाठी 239 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी लाबुशेन 14 धावावर धावचित झाला. संघाची स्थिती 3 बाद 314 असताना स्टीव्ह स्मिथ नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 161 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह 85 धावा झळकविल्या. या कसोटी सामन्याला मंगळवारी सुमारे 43 हजार शौकीन उपस्थित होते. वॉर्नरचे द्विशतक पूर्ण झाल्यानंतर पायामध्ये पेटके येऊ लागल्याने तसेच दमछाक झाल्याने त्याला इतरांच्या आधाराने पॅव्हेलियन गाठावे लागले. वॉर्नरने 254 चेंडूत 2 षटकार आणि 16 चौकारासह द्विशतक झळकविले. त्यानंतर तो दुखापतीमुळे निवृत्त झाला.
मेलबर्नमध्ये आज कडक उन्हाळा असल्याने खेळाडूंची दमछाक होत असल्याचे जाणवले. डावखुऱया वॉर्नरचे कसोटीतील हे 25 वे शतक 144 चेंडूत पूर्ण केले. तसेच 2020 जानेवारीनंतर त्याचे हे पहिले शतक आहे. मंगळवारी उपाहारानंतर वॉर्नरने चौकार ठोकून हे शतक पूर्ण केले. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 231 अशी होती. ऑस्ट्रेलियाने 42 धावांची आघाडी आफ्रिकेवर यावेळी घेतली होती. चहापानादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेने स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडली. दरम्यान वेगवान गोलंदाज नॉर्त्जे हा सुदैवाने गंभीर दुखापतीतून बचावला. मैदानावरील स्पायडरकॅम त्याच्या उजव्या खांद्यावर तसेच कोपरावर आदळल्याने तो खाली पडला. काही क्षण त्याला आपल्याला कोणती वस्तू आदळली हे समजले नाही. त्याच्या कोपराला किरकोळ सूज आली असून ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 363 असताना कॅमेरून ग्रीनलाही दुखापत झाल्याने तो निवृत्त झाला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. नॉर्त्जेचा उसळता चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर आदळल्याने तो जायबंदी झाला. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्गिडी यालाही पायात पेटके आल्याने त्यालाही मैदान सोडावे लागले. तत्पूर्वी वॉर्नर आणि लाबुशेन यांनी दुसऱया गडय़ासाठी 54 धावांची भर घातली. लाबुशेन एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. या घटनेनंतर नॉर्त्जेचा एक उसळता चेंडू वॉर्नरच्या हेल्मेटवर आदळला पण वॉर्नरला गंभीर दुखापत झाली नाही. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 136 अशी होती. उपाहारावेळी वॉर्नर 86 धावावर खेळत होता. वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधील आपला 8000 धावांचा टप्पाही यावेळी ओलांडला. या कसोटीतील मंगळवारचा दिवस डेव्हिड वॉर्नरचाच होता असे म्हणावे लागेल. 8000 धावांचा टप्पा ओलांडणारा वॉर्नर हा आठवा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. वॉर्नरने आपल्या देशाच्या जस्टीन लँगर आणि मार्क वॉ यांना मागे टाकले आहे. लँगरने कसोटी क्रिकेटमध्ये 7696 धावा जमवल्या असून मार्क वॉने 8029 धावा नोंदवल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक ः द. आफ्रिका प. डाव सर्वबाद 189, ऑस्ट्रेलिया प. डाव 91 षटकात 3 बाद 386 (डेव्हिड वॉर्नर दुखापतीने निवृत्त 200, उस्मान ख्वाजा 1, लाबुशेन 14, स्टीव्ह स्मिथ 85, हेड खेळत आहे 48, दुखापतीने निवृत्त 6, कॅरे खेळत आहे 9, रबाडा 1-94, नॉर्त्जे 1-50).

वॉर्नरचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि वयस्कर सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील 100 व्या कसोटीत दमदार द्विशतक झळकविले. तसेच तब्बल दोन वर्षानंतर वॉर्नरचे हे पहिले शतक असल्याने त्याचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या शौकिनांनी त्याच्या या कामगिरीचे खास अभिनंदन करत त्याला मानवंदना दिली. 2020 नंतर वॉर्नरला पहिल्या कसोटीत खेळताना फलंदाजीचा सूर मिळाला. 2020 च्या जानेवारीत वॉर्नरने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद शतक (111) झळकविले होते. गेली दोन वर्षे फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी तो झगडत होता. 2021 च्या क्रिकेट हंगामात वॉर्नरने 5 कसोटी सामन्यात 8 डावात 38.37 धावांच्या सरासरीने 307 धावा जमवल्या असून त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या कसोटीपूर्वी वॉर्नरने 10 कसोटीत 20.61 च्या सरासरीने 371 धावा जमवल्या असून त्यामध्ये 2 अर्धशतके आहेत.
शतक महोत्सवी कसोटीत शतक झळकवणारा डेव्हिड वॉर्नर हा एकंदर दहावा फलंदाज आहे. यापूर्वी इंग्लंडचे कॉलिन कौड्रे, पाकचा जावेद मियादाद, विंडीजचा गॉर्डन ग्रिनीज, इंग्लंडचा ऍलेक्स स्टीवर्ट, पाकचा इंझमाम उल हक, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटींग, दक्षिण आफ्रिकेचे ग्रीन स्मिथ आणि हाशिम आमला तसेच इंग्लंडचा जो रुट यांनी असा बहुमान प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियातर्फे 100 व्या कसोटीत शतक झळकवणारा वॉर्नर हा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी माजी कर्णधार रिकी पाँटींगने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2006 विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या डावात 120 तर दुसऱया डावात नाबाद 143 धावा झळकविल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या कार्यरत असलेल्या क्रिकेटपटूंच्या सर्वाधिक शतके नोंदवणाऱया क्रिकेटपटूंच्या यादीत वॉर्नर दुसऱया स्थानावर आहे. या यादीत भारताचा विराट कोहली 72 शतकांसह पहिल्या तर वॉर्नर 45 शतकांसह दुसऱया, इंग्लंडचा रुट 44 शतकांसह तिसऱया तसेच रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ प्रत्येकी 41 शतकांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. सलामीचा फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके नोंदवणाऱया फलंदाजांमध्ये डेव्हिड वॉर्नरने एकूण 45 शतके झळकवली असून त्याने भारताच्या सचिन तेंडुलकरचा वनडेतील 45 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉर्नरने वनडेत 20 तर कसोटी क्रिकेटमध्ये 25 शतके झळकविली आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वीच नोंदवला आहे. विंडीजच्या गेलने सलामीला फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 42 शतके नोंदवली आहेत.
वॉर्नरच्या 8000 धावा
कसोटी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरने 8000 धावांचा टप्पा ओलांडला असून असा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा तो आठवा फलंदाज आहे. वॉर्नरने 100 कसोटीत आता 183 डावात 46.21 धावांच्या सरासरीने 8042 धावा जमवल्या आहेत. माजी कर्णधार पाँटींगने 168 कसोटीत 51.85 धावांच्या सरासरीने 41 शतके आणि 62 अर्धशतकांसह 13,378 धावा नोंदवल्या आहेत. त्यामध्ये 257 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. माजी कर्णधार ऍलन बॉर्डरने 11,174, हेडनने 8625, स्टीव्ह स्मिथने 8503 तर वॉर्नरने 8042 धावा जमवल्या आहेत.









