वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने शनिवारी येथे झालेल्या पाक विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीनंतर कसोटी क्रिकेटला निरोप दिला. यापूर्वीच वॉर्नरने वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली होती. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर भविष्यकाळात क्रिकेट प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत राहण्याची इच्छा डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली.
37 वर्षीय वॉर्नरने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 44.59 धावांच्या सरासरीने 8,786 धावा जमविल्या असून त्यामध्ये 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नरने विविध प्रकारात एकूण 18,612 धावा जमविल्या असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. माजी कर्णधार रिकी पाँटींगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विविध प्रकारात एकूण 27,368 धावांसह पहिले स्थान मिळविले आहे. 2018 साली केपटाऊनच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामध्ये वॉर्नरचा समावेश होता.









