वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दुखापतीमुळे भारताविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील उर्वरित खेळाला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या जागी मॅथ्यू रेनशॉ हा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आहे. 36 वषीय वॉर्नर 1 मार्चपासून इंदूरमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठीही उपलब्ध होऊ शकेल की नाही याविषयी संशय आहे. कारण त्याच्या कोपराला ‘हेअरलाइन फ्रॅक्चर’ झाल्याचे समोर आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वॉर्नरला आता इंदूरमधील तिसऱ्या कसोटीच्या आधी आवश्यक प्रक्रियेतून जावे लागणार आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियन डावाच्या 10 व्या षटकात मोहम्मद सिराजचा चेंड वॉर्नरच्या डोक्मयाला बसून त्याला मैदानावर वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती. मात्र त्याची चाचणी झाली नव्हती. त्याच्या आधी सिराजचा आखूड टप्प्याचा चेंडू खेळताना वॉर्नरच्या डाव्या कोपराला मार लागला होता.
सदर दोन धक्के स्वीकारावे लागूनही वॉर्नरने फलंदाजी सुरू ठेवली होती, अखेरीस 15 धावांवर तो बाद झाला होता. परंतु पहिल्या दिवशी भारताने फलंदाजी केली तेव्हा तो क्षेत्ररक्षणासाठी आला नव्हता. पहिल्या दिवशी खेळ संपल्यानंतर सहकारी सलामीवीर उस्मान ख्वाजा म्हणाला होता की, हाताला आणि नंतर डोक्याला मार लागल्याने वॉर्नर सध्या थोडा थकला आहे. वॉर्नरला दुखापत झाल्याने रेनशॉ संघात परतला आहे. त्याला पहिल्या कसोटी सामन्यानंतर वगळण्यात आले होते. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 0 आणि 2 धावा केल्या होत्या. रेनशॉ हा एक ऑफ-स्पिनरही असला, तरी ‘आयसीसी’च्या नियमांनुसार तो गोलंदाजी करू शकणार नाही.









