वृत्तसंस्था/ मेलबर्न
यजमान भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीने सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या रविवारी अहमदाबादमध्ये सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरताना यजमान भारताचा पराभव केला होता.
नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक म्हणजे 535 धावा जमविल्या होत्या. ही स्पर्धा संपल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असून ऑस्ट्रेलिय टी-20 संघाचे नेतृत्व मॅथ्यू वेडकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनम येथे 23 नोव्हेंबर रोजी खेळविला जाणार आहे. या मालिकेसाठी सुरूवातीला घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघामध्ये डेव्हिड वॉर्नरचा समावेश करण्यात आला होता. पण आता त्याच्या जागी अष्टपैलू अॅरॉन हार्डीचा समावेश करण्यात आला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी मोहिमेनंतर डेव्हिड वॉर्नर आता मायदेशी प्रयाण करणार आहे.
चालू वर्षाच्या प्रारंभी डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यानुसार पाक विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत वॉर्नर खेळणार असून ही त्याची शेवटची मालिका राहिल, असे सांगण्यात आले आहे. मात्र आणखी काही दिवस आपण वनडे क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे स्पष्टीकरण वॉर्नरने केले आहे. 37 वर्षीय वॉर्नरने भारतात नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सातत्य राखत आपल्या संघाच्या विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. विजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील सात क्रिकेटपटू भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार आहेत. अॅबॉट, हेड, इंग्लिस, मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, झॅम्पा, स्टोइनिस यांचा ऑस्ट्रेलियन टी-20 संघात समावेश आहे. तर भारताच्या टी-20 संघामध्ये विश्वचषक स्पर्धा खेळलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किसन आणि प्रसिद्धकृष्णा या तीन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. श्रेयस अय्यर या मालिकेतील रायपूर आणि बेंगळूर येथे होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यात खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, बेरहेनडॉर्फ, अॅबॉट, डेव्हिड, इलिस, ट्रॅव्हिस हेड, इंग्लिस, मॅक्सवेल, तनवीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, स्टोइनिस, रिचर्डसन, झॅम्पा.









