वृत्तसंस्था / मँचेस्टर
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा माजी अनुभवी धडाकेबाज फलंदाज डेव्हीड वॉर्नरने आपल्या निवृत्तीनंतरही क्रिकेटच्या टी-20 प्रकारात अद्याप आपला सहभाग दर्शविताना सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळविताना भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द 100 क्रीडा स्पर्धेतील सामन्यात लंडन स्पिरीट्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. मँचेस्टर ओरिजनलच्या सामन्यात वॉर्नरने 51 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह स्ट्राईक रेट 139 राखत 71 धावा झोडपल्या. पण वॉर्नरच्या लंडन स्पिरीट्स संघाला हा सामना जिंकता आला नाही. मँचेस्टर ओरिजनलने लंडन स्पिरीटला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते.
मँचेस्टर संघाच्या डावात फिल सॉल्टने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31, मॅकेनीने 12 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 29 तर बटलरने 37 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 46 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरने 419 टी-20 सामन्यात 36.80 धावांच्या सरासरीने 140 पेक्षाअधिक स्ट्राईररेट राखत 13545 धावा जमविल्या असून यामध्ये 8 शतके आणि 113 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 135 ही वॉर्नरची सर्वोच्च खेळी आहे. भारताच्या विराट कोहलीने टी-20 प्रकारात 414 सामन्यात 13543 धावा जमविल्या असून त्यामध्ये 9 शतके आणि 105 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारात विराटची नाबाद 122 ही सर्वोच्च खेळी आहे. विंडीजच्या ख्रिस गेलने टी-20 प्रकारात 463 सामन्यात 14562 धावा जमविताना 22 शतके आणि 88 अर्धशतके नोंदविली असून नाबाद 175 ही सर्वोच्च खेळी आहे. टी-20 प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेल पहिल्या स्थानावर असून वॉर्नर दुसऱ्या तर कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.









