वृत्तसंस्था/ पोर्ट मोरेस्बी
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचल्यानंतर त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी त्यांना पदस्पर्श केला. यानंतर विमानतळावरच ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. या इंडो पॅसिफिक प्रदेशाला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.
आजपर्यंतची आपली परंपरा मोडत पापुआ न्यू गिनी सरकारने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथे सूर्यास्तानंतर कोणत्याही परदेशी पाहुण्यांचे राज्य सन्मानाने स्वागत केले जात नाही, परंतु भारताचे महत्त्व पाहून तेथील सरकारने त्यांचे उत्साहाने स्वागत केले. आता ते सोमवार, 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप आणि नवीन गव्हर्नर सर बॉब डेड यांच्याशी चर्चा करतील. यानंतर, ते पॅसिफिक बेट देशांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड को-ऑपरेशन समिटमध्ये (एफआयपीआयसी) सहभागी होतील. या बैठकीसाठी सर्व 14 बेट राष्ट्रांचे प्रमुख पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. 2014 मध्ये मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान ‘एफआयपीआयसी’चे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित देशांची पंतप्रधान मोदींसोबतची ही तिसरी बैठक असेल.

शांतता स्मारकाला भेट
नरेंद्र मोदी यांनी रविवारी पीस मेमोरियल पार्कला भेट दिली. येथे त्यांनी पीस मेमोरियल म्युझियमला भेट दिली आणि हिरोशिमा दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना श्र्रद्धांजली वाहिली. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्याने हजारो लोक मरण पावले होते.
जी-7 बैठकीच्या निमित्ताने विदेश दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. जी-7 हा जगातील सात विकसित आणि श्रीमंत देशांचा समूह आहे. ज्यामध्ये पॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. त्याला ग्रुप ऑफ सेव्हन असेही म्हणतात.
25 मे रोजी मायदेशी परतणार
पापुआ न्यू गिनीचा दौरा आटोपून मोदी 23 मे रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. येथे ते भारतीय समुदायातील लोकांना संबोधित करतील. 24 मे रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर 25 मे रोजी सकाळी दिल्लीला परतणार आहेत.









