वार्ताहर/कडोली
म्हैसूर येथे दसरा महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धेत सीएम चषक व दसरा किशोरी लढतीत विजय संपादन करून दुहेरी मुकुट मिळविलेल्या स्वाती पाटीलचे मूळगावी कडोली येथे भव्य स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. स्वाती पाटीलचे कडोली येथे आगमन झाल्यानंतर ग्राम पंचायत, गावातील विविध संघ, संस्थांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मार्ग पेठ गल्लीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्राम पंचायतजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजू मायाण्णा, राजू कुट्रे, दत्ता सुतार, संजय कांबळे, विविध संस्थांचे सदस्य, ग्रा. पं. सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









