शहर परिसरात तापमानात घट : पहाटे-सायंकाळच्या वेळी गारठा
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाने उसंत घेतल्यानंतर शहरातील तापमानात घट होत आहे. त्यामुळे शहरात सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही गारठा वाढू लागला आहे. त्यामुळे उबदार कपडय़ांना मागणी वाढली आहे. विशेषतः स्वेटर, जॅकेट्स, कानटोप्या, हातमोजे आणि इतर उबदार कपडय़ांना पसंती दिली जात आहे.
मागील चार दिवसांपासून हळूहळू थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तापमान घटल्याने पहाटे धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱया नागरिकांना बोचरी थंडी अनुभवावयास मिळत आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्स मफलर, टोपी, स्वेटर घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत. शिवाय अधून-मधून वातावरणात बदल होत असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे गारठा निर्माण होत असल्याने उबदार कपडे खरेदीला पसंती दिली जात आहे.
शहर आणि ग्रामीण भागात हळूहळू थंडी सुरू होत असल्याने कपाटातील उबदार कपडे बाहेर काढले जात आहेत. त्याबरोबरच स्वेटर आणि जॅकेटची खरेदी केली जात आहे. साधारण 300 ते 1000 रुपयांपर्यंत स्वेटरच्या किमती आहेत. कानटोप्या 70 ते 200 रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि वाढत असलेल्या थंडीमुळे उबदार कपडय़ांना मागणी वाढत आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबणीवर पडल्याने म्हणावी तशी ऑक्टोबर हीट जाणवली नाही. त्यानंतर आता लगेचच थंडीला प्रारंभ झाला आहे. शहरातील किमान तापमान 16 अंशांपर्यंत खाली येत आहे. त्यामुळे नागरिकांना पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटलेल्या दिसणार आहेत.









