टाळ-मृदंगाचा गजर करत बेळगाव परिसरातून 15 दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर : विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ
बेळगाव : हातात पताका, डोक्यावर तुळशीकट्टा आणि टाळ मृदंगाचा गजर करत शहर परिसरातून 10 ते 15 दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी भजनात तल्लीन होऊन वारकऱ्यांचा पायी मार्ग सुरू आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदाय ‘वारकरी चालती पंढरीची वाट’ असे चित्र पहावयास मिळत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारीसाठी बेळगाव परिसरातून पारंपरिकरित्या दिंड्या मार्गस्थ होतात. मात्र मागील दोन वर्षांत कोरोनामुळे या दिंड्या थांबल्या होत्या. यंदा पूर्ववतपणे दिंडी सोहळा सुरू झाला आहे आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. बेळगाव परिसरातील वारकरी महासंघ बेळगाव, सुळगा, कणबर्गी, निलजी, आंबेवाडी, कडोली, सांबरा, अष्टे, कुद्रेमनी, हंगरगेसह खानापूर येथूनदेखील दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. तत्पूर्वी या दिंड्या पंढरपुरात दाखल होणार आहेत.
12 जूनपासून दिंड्यांनी प्रस्थान केले आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग, भुतरामहट्टी, चिक्कालगु•, जैनापूर, अंकली, म्हैसाळ, यल्लाम्मादेवी मंदिर भोसे, अंबळगाव, शेळकेवाडी, हत्तीद, कासेगाव मार्गे दिंड्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. सासूरवाशिणीला जशी माहेरची ओढ लागावी तशी वारकऱ्यांनादेखील विठोबाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे वारकरी दिंडीत भजन, कीर्तनात तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक झाले आहेत. या दिंड्यांमध्ये विविध गावचे वारकरी सहभागी झाले आहेत. विशेषत: पुरुष वारकऱ्याबरोबर महिलादेखील डोक्यावर तुळशीकट्टा घेऊन मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. या दहा-पंधरा दिवसाच्या पायी प्रवासादरम्यान सन्मार्ग, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, सुखी संसार याबाबतही मंत्र दिले जातात. त्यामुळे वारकरी तन-मन-धन विसरून दिंडीत सहभागी होतात. न दमता आणि न थकता विठुरायाच्या नामस्मरणात दिंडी सोहळा पूर्ण करण्यासाठी वयोवृद्ध वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे.
केवळ भगवंताच्या दर्शनासाठी दिंडीत सहभागी : हभप गोविंद महाराज, निलजी
निलजी येथून दिंडीला प्रारंभ झाला आहे. मागील कित्येक वर्षांपासून दिंडी पारंपरिकरित्या सुरू आहे. केवळ भगवंताच्या दर्शनासाठी वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. भगवंताच्या आशीर्वादानेच न दमता न थकता दिंडी सोहळा यशस्वी होतो.









