बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त नैर्त्रुत्य रेल्वेने सुरू केलेल्या हुबळी-पंढरपूर रेल्वेला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव रेल्वेस्थानकावर भाविकांनी गर्दी केली होती. रेल्वेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. हुबळी, बेळगाव, खानापूर, लोंढा या परिसरात मोठ्या प्रमाणात वारकरी आहेत. हे वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. यापूर्वी बेळगावहून पंढरपूरला दैनंदिन रेल्वेसेवा उपलब्ध होती. परंतु मागील काही वर्षांपासून थेट रेल्वे बंद असल्याने केवळ आषाढी एकादशी दरम्यान विशेष रेल्वे सोडली जात आहे.
वारकऱ्यांच्या मागणीनुसार, तसेच राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी-पंढरपूर अशी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दि. 1 ते 8 जुलै (4 जुलै वगळता) एक्स्प्रेस हुबळी-पंढरपूर-हुबळी या मार्गावर धावणार आहे. मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल झाली. रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य श्रीधर हुलिकावी यांच्यासह इतर सदस्यांनी रेल्वेचे जोरदार स्वागत केले. मिठाई वाटून वारकऱ्यांनी आनंद साजरा केला. सध्या केवळ आषाढी एकादशीसाठी एक्स्प्रेस उपलब्ध असली तरी ती कायमस्वरुपी करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून केली जात आहे.









