आखाडा येथील वारकरी सीताकांत भोसले : पाटणे येथे आला ह्य्दयविकाराचा झटका
वार्ताहर /माशेल
माशेल येथून 11 जून रोजी पंढरपूरच्या पायी वारीस निघालेल्या वारकऱ्याचा ह्य्दयविकाराच्या तीव्र झटक्याने वाटेतच मृत्यू झाला. सीताकांत दशरथ भोसले (66 वर्षे, मूळ आखाडा येथील, सध्या राहणारे गणेशनगर, खांडोळा-माशेल) असे त्यांचे नाव आहे. ते गेली दहा वर्षे पायी पंढरपूर वारी करत होते. माशेलहून 11 जून रोजी पंढरपूरच्या पायी वारीला प्रारंभ झाला होता. वारकऱ्यांनी 12 जून रोजी दोडामार्ग येथे विजघर माऊली मंदिर येथे मुक्काम केला होता. त्यानंतर 13 रोजी पाटणे येथे मुक्काम करून काल बुधवारी 14 रोजी पहाटे आंघोळीनंतर पायी वारीला प्रारंभ केला होता. वारीत चालत असतानाच सीताकांत भोसले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते आपल्या सहकाऱ्याच्या वाहनात बसले, मात्र ह्य्दयविकाराच्या तीव्र झटक्याने त्dयांचे निधन झाले. इस्पितळात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बुधवारी दुपारी त्यांचे पार्थिव माशेल येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आखाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी नार्वे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते एक राष्ट्रीयकृत बॅकेचे निवृत्त कर्मचारी होते. माशेल भागात नावाजलेले उत्कृष्ट भजनपटू होते. पखवाज हे त्यांचे आवडीचे वाद्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा, पुत्र साईश, स्नुषा सान्वी, अक्षय व नातू श्रेय असा परिवार आहे.









