दोन वर्षांचा बाल शारवीन संदिप नाईक आनंदा नाचला
तिसवाडी : पानवेल रायबंदर येथील पानवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळाने वारकरी सेवा उपक्रमात यंदाही सातत्याने 9 व्या एक दिवशीय वारकरी भोजन सेवा अन्नपुर्णा सेवेचा उपक्रम मोठ्या आनंदात पार पाडला. यावर्षी मंडळातर्फे उस्ते वाळपई सत्तरी तालुक्यातील श्रीराम माऊली मंडळाला अन्नसेवा व जिन्नस वाटप, तसेच वारकरी माऊलीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा 9 व्या वर्षी हा वारकरी संप्रदाय भोजन सेवा उपक्रमाव्दारे उस्ते वाळपई सत्तरी तालुक्यातील वारीला जाणारे श्रीराम माऊली वारकरी मंडळाची कर्नाटक प्रांतातील गोल्याळी गावातील श्री सातेरी मंदिर देवस्थानाच्या परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या अगरशाळेत अन्नपुर्णा मोठ्या उत्सवात राबविली. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सेवेकरी सदस्य मंडळीचा सहभाग होता. मंडळाच्या या उपक्रमात 75 सदस्यांनी वारकरी अन्नपूर्णा सेवा उपक्रमात सहभागी झाले. तसेच नागेश महारूद्र भजनी मंडळ, कुडका सहभागी झाले होते. या वारीसेवेच्या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक शिवदास विठ्ठल नाईक रायबंदर वय 86 वर्षे तर सर्वांत लहान माऊली कुमार शारवीन संदिप नाईक आडपई दोन वर्षे आपल्या आई वडिला समवेत सहभागी झाले. या वारीचे नेतृत्व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदिप सत्यवान नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सातत्याने 8 वर्षे प्रशांत दुलबा नाईक यांनी महाप्रसाद तयार करण्याची व वारीच्या स्थळावर मुक्कामी पोचविण्याची जबाबदारी योग्यरित्या हाताळली आहे. तद्पुर्वी या समारोप तथा वारकरी सन्मान सोहळ्याच्या प्रारंभी श्री देवकीकृष्ण वारकरी मंडळातील यंदाच्या वारीच्या प्रवासात दिवगंत वैकुंठवासी झालेले सिताकांत दशरथ भोसले (66) या माशेलातील वारकऱ्याप्रती शांतता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.
त्यानंतर पानवेलकर मंडळातर्फे वारकरी सन्मान सोहळ्यात श्रीराम वारीसमवेत सहभागी झालेले बारकेलो पुनो राणे (उस्ते, वाळपई सत्तरी) यांचा सन्मान सोहळा रायबंदरचे ज्येष्ट नागरिक शिवदास नाईक व शंतनु गरूड यांच्या हस्ते गौरविण्यात आला. विठोबा रामा गावंस (ज्येष्ठ पुरूष माऊली वारकरी) यांना डॉ. अशोक पटवर्धन (बायंगिणी ओल्ड गोवा) व प्रसिध्दी खात्याचे कर्मचारी संजय केणी (डोंगरी) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रीमती सुमती वेळूस्कर (ज्येष्ट महिला वारकरी) यांचा सौ. संगीता व सुदेश नाईक (पानवेल, रायबंदर) संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पांडुरंग विठोबा गांवकर (श्रीराम माऊली मंडळ) वारी व्यवस्थापक प्रमुख यांचा सन्मान सोहळा पा.सां. मंडळाचे अध्यक्ष संदिप सत्यवान नाईक व सौ. भक्ति संदिप नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आला. मारूती गुरव यांनी संजय गुरव (श्री सातेरी देवस्थान गोल्याळी, कर्नाटक) व्यवस्थापक प्रमुख यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष साईश व स्नेहल आमोणकर या दांपत्यामार्फत सन्मानित करण्यात आला. प्रशांत दुलबा नाईक व सौ. विद्या नाईक (पानवेल, रायबंदर) भोजनसेवा उपक्रमाचे भोजनसेवा पुरविणारे सहाय्यक प्रमुख यांचा गौरव व त्यांच्या सौभाग्यवतीचा मानसन्मान पांडुरंग गांवकर ( सत्तरी) व मारूती गुरव (गोल्याळी, कर्नाटक) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रीराम माऊली वारकरी मंडळाचे आणखीन एक ज्येष्ट वारकरी बुवा रोहिदास गोसावी यांचा सन्मान दै. तरूण भारतचे छायाचित्रकार सतीश गोविंद कुंकळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीराम माऊली वारकरी मंडळतर्फे प्रमुख पांडुरंग गावकर, रोहिदास गोसावी, बारकेलो राणे यांच्याहस्ते पानवेलकर सांस्कृतिक मंडळाच्या प्रती कृतज्ञता व आभार व्यक्त करतांना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संदिप सत्यवान नाईक व सचिव संदिप गणपत नाईक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्वांत मोठा सन्मान किंवा पुर्वपुण्याई म्हणून पुढील प्रवासात मार्गक्रमात करतांना पालखी सोहळ्यात सहभागी होतांना तंबुरा, तुळशीवृंदावन, ध्वज उभारण्याचा मान संदिप ग. नाईक यांना दिला. सर्वांचे लक्ष वेदून घेत होते सर्वांत लहान बाल वारकरी शारवीन संदिप नाईक व आपल्या माऊलीला त्यांची आई सौ. भक्ति संदिप नाईक मोठ्या आनंदात प्रोत्साहित करीत होती.









