सुरक्षा दलांना मिळणार विशेष प्रशिक्षण
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कर्रेगुट्टा पर्वताला कधीकाळी नक्षलवाद्यांच बालेकिल्ला मानले जायचे, आता याच पर्वतावर लवकरच देशातील दुसरे जंगल वॉरफेयर कॉलेज स्थापन केले जाणार आहे. या कॉलेजमध्ये सीआरपीएफ, छत्तीगसड पोलीस, डीआरजी, कोब्रा आणि अन्य सशस्त्र दलांना विशेष प्रशिक्षण मिळणार आहे. या कॉलेजची निर्मिती केंद्र सरकार करणार आहे. तर अन्य मुलभूत सुविधा राज्य सरकारकडून पुरविण्यात येणार आहेत.
छत्तीसगडमध्ये यापूर्वी 2004 साली कांकेरमध्ये काउंटर टेररिजम अँड जंगल वॉरफेयर कॉलेज सुरू करण्यात आले होते. कर्रेगुट्टा पर्वतावर तयार होणारे हे नवे केंद्र नक्षलवाद विरोधातील लढाईला आणखी मजबूत करणार आहे. या भागाला चालू वर्षातच सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या कब्जातून मुक्त करविले आहे.
21 एप्रिल रोजी सुरू झालेल्या मोहिमेदरम्यान 21 दिवसांपर्यंत चाललेल्या कारवाईत 31 नक्षलवादी मारले गेले होते. सुरक्षा दलांनी 214 बंकर्स नष्ट केले असून नक्षलवाद्यांच्या सुमारे 4 तांत्रिक सुविधांनाही नष्ट केले आहे. ही मोहीम आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी मोहिमेपैकी एक मानली जाते.
कर्रेगुट्टा पर्वत रणनीतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुमारे 900 मीटर उंच या दुर्गम पर्वतात शेकडो गुहा असून त्यांचा नक्षलवाद्यांनी दीर्घकाळापासून स्वत:चा कॅम्प आणि शस्त्रनिर्माण करण्याच्या स्थळांप्रमाणे वापर चालविला होता. याचमुळे याला नक्षलवाद्यांची राजधानी देखील म्हटले जात होते. येथे राबविण्यात आलेल्या ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेत सामील जवानांची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना सन्मानित केले आहे.
नक्षलवाद्यांची खोटी विचारसरणी आता अखेरच्या घटका मोजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात छत्तीसगड विश्वास, विकास आणि शांततेच्या नव्या पहाटेच्या वाटचाल करत आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारताचा संकल्प साकार होईल असा विश्वास असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी म्हटले आहे.
डिसेंबर 2023 पासून आतापर्यंत नक्षलविरोधी मोहिमांमध्ये सुरक्षा दलांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. या कालावधीत 453 नक्षलवादी मारले गेले, तर 1616 जणांना अटक करण्यात आली आणि 1666 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. राज्यात 65 नवे सुरक्षा कॅम्प सुरू करण्यात आले आहेत आणि रस्ते, पूल तसेच मोबाइल नेटवर्क यासारख्या मूलभूत सुविधांचा वेगाने विस्तार झाला आहे.









