कराड :
पावसाने जोर धरला असतानाच कराड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरातील एका होलसेल दुकानाच्या तीन गाळ्यांच्या गोडावूनला भीषण आग लागली. दाट वस्तीत मध्यरात्री लागलेल्या आगीने खळबळ उडाली. जिथे आग लागली, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरच अग्निशमन दल असल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत चॉकलेट, बिस्किटे, सिगारेट, तंबाखू व इतर होलसेल मालाचा साठा भस्मसात झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरात दोन्ही बाजूला दाट वस्ती असून व्यावसायिक दुकाने आहेत. या परिसरात एका दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री आग लागली. धुराचे लोट परिसरात पसरल्याने आसपासच्या नागरिकांची झोप उडाली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बघता बघता आगीचे लोट इतके तीव्र होत गेले की, दुकानाच्या आतील संपूर्ण साहित्य, फर्निचर आणि साठवलेला माल काही क्षणांतच जळून खाक झाला. दुकानातून निघणाऱ्या मोठ्या प्रमाणातील धुरामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संग्राम पाटील, कुलदीप कोळी यांनी अवघ्या पाच मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कराड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागास कळवले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागानेही तत्परता दाखवली अन् दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी दोन ते अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिकांनीही पाण्याच्या टाक्या, बादल्या, पाइपच्या साहाय्याने मदत केली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून विद्युत शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.








