म. ए. समिती कार्यकर्त्यांचा निर्धार : न्याय्य हक्कासाठी एकत्र या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीला विधानसभा निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी केवळ बेळगाव शहरात 80 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बेळगावमधील मराठी भाषिकांना आजही समितीच्या संघर्षाची जाण आहे. त्यामुळे पुढील काळात संघटना बळकटीसाठी प्रत्येक वॉर्डनिहाय कार्यकारिणीची निवड केली जाणार असल्याचे रविवारी आयोजित म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले. मराठा मंदिर येथे रविवारी बेळगाव शहर व परिसरातील कार्यकर्त्यांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये म. ए. समितीची भविष्यातील रणनीती या विषयीची चर्चा केली. बेळगाव उत्तर, ग्रामीण व खानापूर समितीला स्वत:चे कार्यालय असताना बेळगाव दक्षिणमध्ये कार्यालय नव्हते. यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे मराठा मंदिर येथे बेळगाव दक्षिणसाठी कार्यालय देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
वॉर्डनिहाय कार्यकारिणी सोबतच विधानसभानिहाय कार्यकारिणी निवडणे गरजेचे आहे. केवळ निवडणुका तोंडावर आल्यावर बैठका घेण्यापेक्षा आतापासूनच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र या, अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली. याचबरोबर विधानसभा निवडणुकांमध्ये नेमका पराभव कशामुळे झाला, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी संघटना बळकट करण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यकर्ते जोडणार असल्याचे सांगितले. बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील, रणजित चव्हाण-पाटील, सागर पाटील, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, संजय शिंदे, मदन बामणे, शिवराज पाटील, सुनील देसूरकर, चंद्रकांत कोंडुस्कर, अभिजीत मजुकर, आनंद आपटेकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









