15 प्रभागांपैकी 5 महिला व 2 ओबीसी
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा नगरपालिकेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रभाग फेररचना पूर्ण होऊन गोवा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे. एकूण पंधरा प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी तर 2 ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. फोंडा पालिकेचा कार्यकाळ येत्या 20 मे रोजी संपुष्टात येत असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्र. 3 (सांताक्रूझ), प्रभाग 8 (वारंखडे), प्रभाग 10 (दुर्गाभाट), प्रभाग 11 (पंडितवाडा) व प्रभाग 15 (शांतीनगर पार्ट) हे महिलांसाठी तर प्रभाग 5 (दाग व खडपाबांध पार्ट) व प्रभाग 10 (दुर्गाभाट) हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. त्यातही प्रभाग 10 हा महिला ओबीसी आरक्षित झाला आहे. काही प्रभागांमध्ये फेररचना करण्यात आली आहे.
रितेश नाईक, प्रदीप नाईक, कोलवेकर यांचे प्रभाग आरक्षित
माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रदीप नाईक यांचा वारखंडे प्रभाग 8 हा महिलांसाठी आरक्षित तर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांचा दुर्गाभाट प्रभाग 10 हा महिला ओबीसी आरक्षित झाला आहे. नगराध्यक्ष रितेश नाईक यांचा पंडितवाडा प्रभाग 11 महिलांसाठी आरक्षित झाला असून ते प्रभाग 5 मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विद्यमान पालिका मंडळातील 15 पैकी बहुतेक नगरसेवक पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांच्यासह सध्याच्या कार्यकाळातील माजी नगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा नाईक, विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी, गीताली तळावलीकर हे पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक व शांताराम कोलवेकर यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने ते दुसऱ्या प्रभागातून पुन्हा रिंगणात उतरतील की, आपल्या कुटुंब सदस्यांचा पर्याय अवलंबतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाजप, मगो, काँग्रेसच्या पॅनल्सकडे लक्ष
सन 2018 मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत काँग्रेस, भाजप व मगो रायझिंग फोंडा हे मुख्य पॅनल होते. गेल्या पाच वर्षांमध्ये राजकीय समिकरणे बदलल्याने नवीन पॅनल्सकडे इच्छुक उमेदवार व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसच्या नुकत्याच फोंडा येथे झालेल्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सभेत फोंडा पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व पंधराही जागा लढणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मागील निवडणुकीत मगो व भाजपाचे वेगवेगळे पॅनल्स होते. त्यात डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखालील मगो रायझिंग फोंडा पॅनलने सर्वाधिक 7 तर भाजपाने 5 जागा जिंकल्या होत्या. सध्या राज्यात सत्ताधारी भाजपामध्ये मगो हा घटकपक्ष असल्याने युतीचे संयुक्त पॅनल असेल, की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील हा कळीचा मुद्दा बनला आहे. डॉ. केतन भाटीकर यांनी रायझिंग फोंडाच्या पॅनलचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
रॉय नाईक यांची जोरदार तयारी
या निवडणुकीतील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हेही पालिका निवडणूक लढवित असून सध्या त्यांचा प्रचार जोरात सुऊ आहे. त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल जाहीर केले नसले तरी त्यांच्या नेतृत्त्वाखाली काही उमेदवार विविध प्रभागातून लढण्यास इच्छुक आहेत.









