ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार करून पीडीआंsना धरले धारेवर : 32 गुंठे जमिनीचा मुद्दा ऐरणीवर
वार्ताहर/धामणे
राजहंसगड गावातील वॉर्डसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पीडीओ आणि ग्रा.पं. अध्यक्ष व अधिकाऱ्यांना ही सभा रद्द करावी लागली. सुळगे (ये.) ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील राजहंसगड गावात दवंडी देवून दि. 12 रोजी वॉर्डसभेचे आयोजन ग्रा. पं.ने केले होते. सभेला पीडीओ भूजपाळी जकाती, अध्यक्ष व सदस्य आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. परंतु सभेच्या सुरुवातीलाच उपस्थित नागरिकांनी 32 गुंठे जमिनीच्या मोजणीबद्दल विचारणा केली. ज्यांनी 5 एकर जमिनीबाबत विचारणा व जमीन मोजणीचा अर्ज दिला तो दिशाभूल करणारा आहे. त्यावर नागरिकांच्या बोगस सह्या केल्या असून त्याची चौकशी करून प्रथम 32 गुंठेंचा सर्व्हे करा. मगच वॉर्डसभा घ्या, असे बजावले.
कामे पूर्ण होईपर्यंत वॉर्डसभा नाही
गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेली पाण्याची योजना कुचकामी ठरली असून त्याची चौकशी करा. त्याचबरोबर महादेव गल्ली आणि मारुती गल्लीच्या पाठिमागील भंगी रस्त्याचे काम का करत नाही. जोपर्यंत ही कामे करत नाहीत तोपर्यंत वॉर्डसभा होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे 32 गुंठे जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे काम करुया म्हणून पोलीस संरक्षण घेवून आला होता. मग अधिवेशन सुरू असताना पोलीस संरक्षण नसतानाही वॉर्डसभा घेण्याची घाईगडबड का? असे म्हणत नागरिकांनी पिडीओंना धारेवर धरुन ही वॉर्डसभा बंद करण्यास भाग पाडले. याप्रसंगी लक्ष्मण थोरवत, हणमंत नावगेकर, शिवाप्पा बुर्लकट्टी, पी. जी. पवार, तानाजी लोखंडे, गंगाधर पवार, सुरेश थोरवत, सिद्धाप्पा पवार, महादेव थोरवत आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









