कास वार्ताहर
जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे सेवा बजावतन असताना सांडवली ( वारसवाडी ) ता .सातारा येथील जवान विजय रामचंद्र कोकरे याला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने विरमरण प्राप्त झाले या दुःखदायक घटनेची माहीती कळताच नातेवाईकांसह सातारा परळी खोऱ्यातून शोक व्यक्त होत आहे.
२१ मार्च २०१७ रोजी सैन्यदलात भरती झालेल्या विजय कोकरे यांनी देशाच्या विविध सिमेवर सात वर्ष देश रक्षणाची सेवा केली तो २५ आर आर मद्रास या युनिट मध्ये कार्यरत होता सेवा बजावत असताना गुरुवारी जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराम त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापुर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. हि बातमी त्याच्या कुंटुंबीयांना कळताच आई वडील नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटुन टाकणारा होता हि वार्ता मुंबईसह सातारा जिल्ह्यात व त्यांच्या मुळ गावी वाऱ्यासारखी पसरताच सर्व स्तरातुन शोक व्यक्त होऊ लागला आहे.
रोजगारासाठी मुंबईत
मुंबईमध्ये दुसऱ्याची टॅक्सी चालवुन आपार कष्ट करत वारसवाडीच्या रामचंद्र कोकरे यांनी आपल्या मुलाला मुंबईत चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन सैन्य दलात भरती केले. सात वर्ष सेवा बजावत असताना येणारे अनेक प्रसंग वडीलांकडे विजय कथन करत असे नुकताच महीनाभर सुट्टीवर आलेला विजय मुंबईतुन रविवारी सुट्टी संपल्याने जम्मू काश्मीरकडे नोकरीवर हजर होण्यासाठी रवाना झाला हि त्याची अखेरची भेट आई वडील नातेवाईकांसोबतच ठरली.
तर गुरुवारी सकाळी व्हिडीओ कॉल वर वडीलांशी सवांद साधत काही वेळ ख्याली खुशालीची चर्चा केली अन ऑफीसमध्ये जातोय फोन ठेवतो म्हणत शेवटचे बोलणे झाले आणि फोन ठेवला. अन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विजयचे निधन झाल्याची घटना समजताच वडीलांना धक्का बसला.
जवान विजय कोकरे यांचे पार्थिव आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मुंबईत आणले जाणार असुन मुंबईच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी पार्थीव अंतीम दर्शनासाठी ठेवले जाणार असुन त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे मुंबईतच अंतिम अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे









