वराडे ता. कराड येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यानी धुमाकूळ घातला. चोरट्यानी भरवस्तीत असणारी घरे फोडण्याचा प्रयत्न केला. जुन्या पाण्याच्या टाकीजवळील बाहेरुन कुलुप लावले घर फोडून चोरट्यानी तीन तोळ्याचे दागिने व पाच हजाराची रोकड लंपास केली आहे तसेच दारासमोर दुचाकी घेवून पोबारा केला. अन्य एका शॉपच्या बाहेरुन दुचाकी लंपास केली आहे . ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान घटनास्थळी तळबीड पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
सोमवारी २२ रोजी पहाटे पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश केला. पहाटेच्या सुमाराच्या लोक साखर झोपेत असतात यांचा फायदा घेत बाहेरील चालु बल्ब काढून ठेवून अनेक घरांना बाहेरुन कड्या लावून जुन्या पाण्याच्या टाकीजवळील असणाऱ्या नाथाजी हनुमंत साळुंखे यांच्या घराला चोरट्याने लक्ष केले. तीव्र उकाड्यामुळे साळुंखे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत टेरेसवर झोपले होते. त्यांनी घराला बाहेरुन कुलूप लावले होते याचा गैरफायदा घेत चोरट्यानी डाव साधला. कुलूप तोडून चोरट्यानी घरात प्रवेश केला व आतील खोलीतील कपाटे उचकटून साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. कपाटातील तीन तोळ्याचे गंठण, पैजन जोडवी पाच हजाराची रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागले. तसेच घरासमोर लावलेली बजाज डिस्कव्हर दुचाकी घेवून चोरट्यानी तेथून पोबारा केला. तसेच येथून जवळच असणाऱ्या सचिन शिवाजी साळुंखे यांच्या शेड समोर लावलेली निखिल शिवाजी सावंत राहणार मुंढे यांची नवी कोरी हिरो कंपनीची दुचाकी चोरट्याने लंपास केली आहे. ही दुचाकी चोरून नेताना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. या धाडसी चोऱ्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे









