दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआय छापे टाकल्यानंतर ते आता चौकशीच्या फेऱयात अडकले आहेत. तसेच आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक युद्धही सुरू झाले असून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, सीबीआयपाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) सिसोदिया यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबकारी धोरण प्रकरणात सीबीआय अजूनही काही संशयित आरोपींची चौकशी करणार आहे. या तपासासाठी सीबीआयने संबंधितांना समन्स जारी केले आहे.
मद्य घोटाळा प्रकरणातील छाप्यांनंतर दुसऱयाच दिवशी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकूर यांनी केजरीवाल सरकारला रेवडी आणि बेवडी सरकार असे संबोधले. तसेच सिसोदिया यांच्या नावाची खिल्ली उडवत आता ‘मनीष’चे स्पेलिंग “MON EY SHH’’ झाले असल्याचे ते म्हणाले. सरकारचे मद्य धोरण ठीक होते तर ते परत का घेतले गेले? असा प्रश्नही त्यांनी केला. मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसल्यावर त्यांनी दारू धोरण मागे घेतल्याचा दावाही त्यांनी पुढे केला. काळय़ा यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते की नाही? असा प्रश्न करत आम आदमी पक्षाचे सरकार रेवडी आणि बेवडी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.

चौकशीला योग्य प्रतिसाद, पण अटकही करतील!
मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीची अबकारी योजना ही सर्वोत्तम योजना असल्याचे स्पष्ट केले. हे देशातील उदाहरण ठरू शकते. काल माझ्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. सर्व अधिकारी तपास करत होते. सगळय़ांच्या प्रश्नांना मी योग्यप्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. मला त्यांचा काहीही त्रास झाला नाही. तथापि, मला तुरुंगात पाठविण्यासाठी भाजपकडून तयारी केली जात असून राजकीय दबाव टाकून दोन-चार दिवसांत मला अटक करून तुरुंगात टाकले जाईल, असे सिसोदिया म्हणाले.
2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल
2024 ची लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असेल, असा दावाही सिसोदिया यांनी केला. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक केजरीवाल यांना धमकावण्याच्या सर्व युक्त्या पंतप्रधान मोदी आजमावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याची जगभरात चर्चा होत असल्याने केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांना रोखू इच्छिते, असे ते पुढे म्हणाले.
मुंबई कनेक्शन तपासणार
दिल्लीच्या नवीन दारू धोरणाच्या नावाखाली या घोटाळय़ाबाबत सीबीआयने मोठे दावे केले आहेत. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या धोरणाची आखणी दिल्लीत नव्हे तर मुंबईत करण्यात आली होती. त्याची तयारी करताना मुंबईच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माजी सीईओचे नाव समोर आले आहे. सदर धोरणामध्ये पारदर्शकता दाखविण्याचा प्रयत्न करतानाच उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डमध्ये मोठय़ा प्रमाणात फसव्या नोंदी केल्या गेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
सिसोदियांच्या तपासात ईडीची एन्ट्री होणार
मद्य धोरण घोटाळय़ात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह इतर ठिकाणी छापे टाकले आहेत. आता लवकरच याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) एंट्रीही होऊ शकते. सीबीआयच्या एफआयआरनुसार, मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120बी, 477ए आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी, ईडी आयपीसीच्या कलम 120बी आणि पीसी कायद्याच्या कलम 7 या दोन्हींवरील तपासात सामील होऊ शकते. ही दोन्ही कलमे पीएमएलए अंतर्गत गुह्यांमध्ये येतात. अशा प्रकरणांमध्ये ईडी तत्काळ कारवाई करू शकते. मनीष सिसोदिया यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ानुसार 2 कलमे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) येतात. येत्या 1-2 दिवसांत या प्रकरणात ईडीची एन्ट्री होऊ शकते, असा विश्वास ईडीचे माजी उपसंचालक सत्येंद्र सिंह यांनी व्यक्त केला.









