नसिरुद्दीन शहाच्या टीकेला विवेक अग्निहोत्रींचे तिखट प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काही काळापूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला नुकताच नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा हातभार लावल्याने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात तो प्रदान करण्यात आला होता.
तथापि, ‘अशा सुमार दर्जाच्या चित्रपटांना लोकांची एवढी गर्दी होते आणि असे चित्रपट लोकप्रिय होतात, हे धक्कादायक आणि चिंताजनक आहे,’ असे विधान नुकतेच नसिरुद्दीन शहा यांनी एका मुलाखतीत केले होते. सुधीर मेहता, अनुभव सिन्हा, हन्सल मेहता यांचे सत्यदर्शक चित्रपट मात्र सपशेल आपटले, यासंबंधीही शहा यांनी दु:ख व्यक्त केले होते. शहा यांच्या या टिप्पणीचा समाचार काश्मीर फाईल्स चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी घेतला आहे.
पुरस्काराचा तरी मान ठेवा
काश्मीर फाईल्स या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. काही ‘वेड्या’ (व्रेझी) लोकांनी आता तरी या चित्रपटावरची टीका थांबविली पाहिजे. काश्मीरमध्ये 5 लाख लोकांना अत्याचार करुन राज्याबाहेर काढण्यात आलेले आहे. अनेकांना ठार करण्यात आले आहे. अनेक निरपराध महिलांवर बलात्कार झाले आहेत. तथापि, हे विचारांध टीकाकार काही झालेच नाही, अशा अविर्भावात मुक्ताफळे उधळतात. नासिरभाई आता वृद्ध झाल्याने त्यांची मन:स्थिती बरी नसावी, अशा कठोर शब्दांमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे.









