पाकिस्तानी पंतप्रधानांचे वक्तव्य : आर्थिक संकटासाठी आम्हीच जबाबदार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सुरू असलेल्या आर्थिक संकटादरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. युद्ध हा पर्याय नसून आम्ही आमच्या शेजारी देशासोबत चर्चा करण्यास तयार आहोत असे वक्तव्य पंतप्रधान शरीफ यांनी भारताचा उल्लेख करत मंगळवारी केले आहे.
आम्हाला कुणाचीच तक्रार करायची नाही. आम्हाला आमची काळजी घ्यायची आहे अणि स्वत:च्या देशाची उभारणी करायची आहे. आम्ही आमच्या शेजारी देशासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संबंधित देश गंभीर असावा असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
युद्ध आता पर्याय राहिलेला नाही. पाकिस्तान एक आण्विक शक्ती आहे, ही शक्ती एक आक्रमक म्हणून नव्हे तर रक्षणाच्या उद्देशांसाठी आहे. आम्ही मागील 75 वर्षांमध्ये तीन युद्धं लढली आहेत. यामुळे गरीबी, बेरोजगारी अणि साधनसामग्रीची कमतरताच निर्माण झाल्याचे शाहबाज म्हणाले.
कधी आण्विक युद्ध झाल्यास नेमके काय घडले हे सांगण्यास देखील कोणी उरणार नाही. यामुळे युद्ध हा पर्यायच ठरू शकत नाही. असामान्य स्थिती जोपर्यंत आमचा शेजारी देश दूर करत नाही तोवर स्थिती सामान्य होऊ शकत नाही. गंभीर मुद्द्यांना तोपर्यंत शांततापूर्ण आणि सार्थक चर्चेच्या माध्यमातून सोडवावे लागणार असल्याचे शाहबाज यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान 6 ट्रिलियन डॉलर्सचा खनिजसाठा असूनही त्याचा लाभ घेण्यास अपयशी ठरला आहे. आम्ही याकरता दुसऱ्या कोणाला दोषी ठरवू शकत नाही असे शाहबाज यांनी पाकिस्तानच्या आर्थिक दुरवस्थेबद्दल बोलताना नमूद केले आहे.
दहशतवादी कारवाया जोपर्यंत रोखल्या जात नाहीत तोवर पाकिस्तानशी चर्चा करता येणार नसल्याची भूमिका भारत सरकारने घेतली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडविण्याचे प्रयत्न वारंवार केले जातात. तसेच पाकिस्तानातून भारतात अमली पदार्थांची तस्करी घडवून आणली जात आहे.









