रशियाशी चर्चेनंतर विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
मॉस्को / वृत्तसंस्था
जगाची आर्थिक व्यवस्था परस्परावलंबी आहे. एक देश अन्य अनेक देशांवर त्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि प्रगतीसाठी अवलंबून आहे. अशा स्थितीत युद्ध ंकिंवा सशस्त्र संघर्ष यांना कोणतेही स्थान नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते सध्या रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱयावर आहेत. त्यांनी मंगळवारी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी या चर्चेसंबंधी बोलत होते.
रशियाशी आपली गुंतवणूक, व्यापार, वाहतूक, रसदपुरवठा, ऊर्जानिर्मिती प्रकल्प आदी द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा झाली. रशिया-युपेन युद्धावरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असावी असे अनुमान आहे. मात्र, तसा स्पष्ट उल्लेख जयशंकर यांनी केला नाही. तथापि, सध्याच्या काळात युद्धाला स्थान नाही, एवढे सूचक प्रतिपादन त्यांनी केले. त्यांची ही रशिया भेट रशिया-युपेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरच आहे.
रशियाशी मैत्री घनिष्ट
चर्चेनंतर लाव्हरोव्ह यांच्या उपस्थितीतच जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. रशिया आणि भारत यांच्यातील मैत्री काळाच्या कसोटीवर उतरलेली असून ती अत्यंत घनिष्ट आहे. या मैत्रीचा आणखी विस्तार करण्यासाठी विविध स्रोतांचा शोध घेतला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचे प्रयत्न होत आहेत. द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी तूट कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. भारतीय उत्पादनांची रशियाला निर्यात होण्यामधील अडथळे दूर करण्यासंबंधीही बोलणी झाली, असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
युपेनसंबंधी स्पष्ट चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी युपेनसंबंधी विचारविमर्श केला आहे. सध्याच्या काळात युद्धाला स्थान नाही, असे स्पष्ट विधान पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्या आधारावर मंगळवारी चर्चा झाली. जगातील सर्व देश या ना त्या प्रकारे आर्थिकदृष्टय़ा एकमेकांवर अवलंबून असल्याने युद्ध अनावश्यक ठरते. एका भागात होणारे युद्ध आज संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था विचलीत करु शकते, असे भारताचे मत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अफगाणिस्तानला हात द्या
संपूर्ण जगाने अफगाणिस्तानला साहाय्याचा हात देण्याची आवश्यकता आहे. या देशाकडे दुर्लक्ष केल्यास जगाचीच अडचण होऊ शकते. तेथील परिस्थितीची सर्व देशांना जाणीव आहे. अफगाणिस्तानात मानवीय समस्या निर्माण झाल्या असून भारताने तेथील जनतेला अन्न, औषधे, लसी आणि इतर साहाय्यता केली आहे. इतर देशांनीही असे केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अर्थव्यवस्थेवर दबाव
दोन वर्षांचा कोरोना उद्रेक, विविध देशांमधील व्यापारी तूट, व्यापार वृद्धीत येणाऱया अडचणी इत्यादींमुळे जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणामही आता आपण अनुभवत आहोत. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक दुष्परिणाम झाला आहे. दहशतवाद आणि पर्यावरण असमतोल हे मुद्देही अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी ठरत आहेत. या मुद्दय़ांमुळे आर्थिक प्रगती आणि समृद्धीत खंड पडत आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. या सर्व संकटांवर मात करण्याच्या उपायांवरही चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत चार वेळा चर्चा
रशिया-युपेन संघर्ष सुरु झाल्यापासून चार वेळा जयशंकर आणि लाव्हरोव्ह यांच्यात चर्चा झाली आहे. प्रत्येक वेळी भारताने या युद्धाचे दुष्परिणाम रशियाच्या दृष्टीला आणण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनीही रशियाच्या अध्यक्षांशी चर्चा करुन युद्ध थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
द्विपक्षीय संबंधांवरच भर
ड जयशंकर आणि लाव्हरोव्ह यांच्यातील चर्चेत अपेक्षेप्रमाणे सहकार्यावर भर
ड रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर दुष्परिणामही चर्चेचा विषय









