सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांचा सवाल, न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिबिर
प्रतिनिधी /केपे
आपल्याला मोबाईल हवेत, इंटरनेट हवे, पण मोबाईल टॉवर नकोत. हे कसे शक्मय आहे. टॉवरमुळे प्रदूषण होते हे मलाही मान्य आहे. मात्र आपल्याला दोनपैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल, असे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले. ते दिगास-पंचवाडी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलने आयोजित केलेल्या विद्यार्थी शिबिरात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दामोदर पार्सेकर, संतोष भांगी, राया देसाई, केशव नाईक, सरोजा शिरोडकर, मुख्याध्यापक शिवानंद देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित केल्याबद्दल काब्राल यांनी आयोजकांचे कौतुक केले. आपल्याकडून किंवा सरकारकडून कोणतीही मदत हवी असेल, तर सांगा. आपण त्यासाठी नेहमीच तयार असल्याचे ते म्हणाले.
संस्थेचे व्यवस्थापक संतोष भांगी यावेळी बोलताना म्हणाले की, सदर हायस्कूलची स्थपना आम्ही एका लहान घरात केली होती. या हायस्कूलला स्वच्छ भारत पुरस्कार मिळाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शाळांचे शहरी व ग्रामीण असे स्तर करण्यात यावेत. कारण पालक सहसा आपल्या मुलांना शहरी शाळेत घालतात. नंतर गाळली गेलेली मुले ग्रामीण भागांतील शाळांत घातली जातात. सरकारने या मुलांच्या भविष्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. मंत्री काब्राल यांनी सरकारी गाडी, बंगला, सुरक्षा व सरकारी लवाजमा नाकारून फार मोठी बचत केली आहे. याची वाच्यता ते कधीच करत नाहीत. हा त्यांचा मोठेपणा व साधेपणा असल्याचे भांगी म्हणाले.
मुख्याध्यापक देसाई म्हणाले की, मोबाईलवर शिक्षण घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शिक्षण घेणे चांगले. आता विद्यार्थ्यांनी हायस्कूलमध्ये येऊन शिक्षण घ्यावे. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन सुशिला गावस यांनी केले, तर विशाखा गुडे यांनी अहवालवाचन केले.









